China Spy Ship : चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकेवर श्रीलंकेकडून एक वर्षाची बंदी !

भारताच्या दबावतंत्राला मोठे यश !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेने चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकेला त्याच्या बंदरांवर येण्यावर १ वर्षासाठी बंदी घातली आहे. चीन संशोधनाच्या नावाखाली त्याच्या नौका श्रीलंकेच्या बंदरावर उभी करण्याचा प्रयत्न करत होता. यापूर्वी दोन वेळा श्रीलंकेने चीनच्या कथित संशोधन करणार्‍या नौकांना भारताचा आक्षेप असतांनाही बंदरांवर येण्याची अनुमती दिली होती. आता तिसर्‍यांदा चीनची नौका येत्या ५ जानेवारीला श्रीलंकेच्या बंदरावर येणार होती; मात्र त्यापूर्वीच श्रीलंकेने त्याला नकार देत पुढील वर्षभरासाठीच बंदी घातली आहे. मागील वर्षी जुलै मासामध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट झाली होती. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यासमोर या संदर्भातील सूत्र उपस्थित केले होते.

चीनने मालदीवकडेही केली आहे मागणी !

चीनने हिंद महासागरातील मालदीव या बेटांच्या देशाकडेही त्याच्या बंदरावर चिनी नौका उभी करण्यासाठी अनुमती मागितली आहे. श्रीलंकेने नकार दिला असला, तरी मालदीवने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मालदीवमध्ये काही मासांपूर्वीच चीनला समर्थन देणारे राष्ट्रपती महंमद मोईज्जू यांचे सरकार आले आहे. त्यामुळे ‘चीनला त्याची नौका बंदरावर उभी करण्याची अनुमती मिळू शकते’, असे म्हटले जात आहे.