या वर्षात मुंबईतील मेट्रोच्या विविध प्रकल्पांना गती येणार !
मुंबई – येथील पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणार्या ‘मेट्रो ३’ या भूमीगत मार्गिकेचा पहिला टप्पा एप्रिल मासापूर्वी चालू होण्याची शक्यता आहे. या टप्प्याद्वारे सीप्झ, मरोळ, विमानतळाचे दोन्ही टर्मिनल, विद्यानगरी, सांताक्रूझ आणि बीकेसी हे भाग जोडले जाणार आहेत. आरेजवळील सारिपूतनगर ते प्राप्तीकर कार्यालय (बीकेसी) या मार्गिकेवर प्रत्येकी ८ डब्यांच्या १६० फेर्या असतील.
१. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभा करण्यात आलेला बहुचर्चित शिवडी-न्हावाशेवा अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतू हा मुंबईला नवी मुंबईशी २० ते २५ मिनिटांत जोडणारा मार्ग १२ जानेवारीला चालू होणार आहे.
२. ठाणे आणि कल्याण यांना जोडणार्या ‘मेट्रो ५’ या मार्गिकेचे काम चालू आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा ६ स्थानकांचा असून ठाण्यातील कापूरबावडी ते भिवंडीतील धामणकर चौक जोडले जाणार आहेत. पहिल्या टप्प्याचे काम ८३ टक्के पूर्ण झाले आहे.
३. जोगेश्वरीचे स्वामी समर्थनगर ते विक्रोळीजवळील पूर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणारी ‘मेट्रो ६’ या उन्नत मार्गिकेचे कामही प्रगतीपथावर आहे.
४. ‘मेट्रो ९’ ही उन्नत मार्गिका दहिसर ते भाईंदर अशी उभी रहात आहे. ८ स्थानकांच्या मार्गिकेचे काम ७७ टक्के पूर्ण झाले आहे.