श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा कारभार नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपुर्द !

कार्ला (जिल्हा पुणे) – मुंबई उच्च न्यायालयाच्या ४ सप्टेंबर २०१८ च्या निकालानुसार श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा कारभार त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे होता. त्यामुळे नवनिर्वाचित विश्वस्त नवनाथ रामचंद्र देशमुख यांनी सर्व विश्वस्तांच्या सहकार्याने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका प्रविष्ट केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने १९ डिसेंबर या दिवशी त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे असलेला ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपुर्द करावा, असा निकाल दिला. त्यानुसार ३१ डिसेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारी सुहास परांजपे यांच्या समवेत हा ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

त्या आदेशानुसार वडगाव येथे त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीच्या अध्यक्षा सी.आर्. उमरेडकर, सचिव तहसीलदार विक्रम देशमुख आणि नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे मारुति देशमुख, विकास पडवळ आदींसह मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारी सुहास परांजपे अशी संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा ताबा नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपुर्द करण्यात आला.