‘धर्मकार्यातील अडथळे दूर व्हावेत’, यासाठी स्थूल प्रयत्नांसह आध्यात्मिक स्तरावरील उपायही करा !
साधक आणि कार्यकर्ते यांना सूचना
‘हिंदु राष्ट्र स्थापने’साठी धर्मजागृतीचे उपक्रम राबवत असतांना विविध प्रकारच्या अडचणी येतात, उदा. पोलिसांची अनुमती मिळण्यास अडथळे येणे, धर्मद्रोह्यांनी अडथळे आणणे, साधकांना त्रास होणे इत्यादी. या अडचणींवर मात करण्यासाठी स्थुलातील प्रयत्न करत असतांना ते अडथळे दूर होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायही करावेत. प्राथमिक टप्प्यात एखाद्या उपक्रमात अडथळे येत असल्याचे लक्षात आल्यास त्या उपक्रमाशी संबंधित प्रसार साहित्यावरून (उदा. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’मध्ये अडथळे येत असल्यास त्याच्या भित्तीपत्रकावरून) नारळ उतरून फोडावा. अशा प्रकारे जोपर्यंत नारळ आडवा फुटत नाही, तोपर्यंत नारळ उतरून फोडत रहावेत.
सध्या काही ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’मध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी साधक हा आध्यात्मिक उपाय करत आहेत. त्याचा त्यांना लाभही होत आहे. अशा प्रकारे हिंदू अधिवेशने, हिंदू संघटन मेळावे, राष्ट्र आणि धर्म जागृतीपर चित्र-प्रदर्शने, मोठी ग्रंथ प्रदर्शने यांसारख्या समष्टीशी संबंधित असलेल्या उपक्रमांपूर्वीही आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नारळ फोडावेत.