अवैध उत्खनन आणि नियमबाह्य वाहतुकीविषयी ‘आरटीओ’ आणि प्रांताधिकार्यांनी कारवाई करावी ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह
रत्नागिरी (जिमाका) – मौजे रोवले आणि उंबरशेत येथे खाणकामामध्ये चालणारे अवैध उत्खनन अन् नियमबाह्य वाहतुकीविषयी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि दापोली प्रांताधिकार्यांनी तपासणी करून त्वरित कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या लोकशाहीदिनात १२ अर्ज प्रविष्ट झाले होते. या वेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह यांनी प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाबाबत माहिती घेऊन संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या. चौपदरीकरणामधील संपादित मोबदला देण्याविषयी भूसंपादन शाखेने त्वरित कार्यवाही करावी. पैसे भरूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी न झाल्याने जाब विचारत जिल्हाधिकार्यांनी त्वरित मोजणी करण्याविषयी सूचना केली.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘‘संबंधित अधिकार्यांनी कोणतेही अर्ज प्रलंबित ठेवू नयेत. त्याला वेळेत उत्तरे द्यावीत. काही खोट्या तक्रारी दाखल झाल्याची शंका आल्यास, त्याविषयी चौकशी करून आणि तपासून अशा अर्जदारांवर फौजदारी प्रविष्ट करावी.