श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भ्रष्टाचार्यांना पाठीशी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड !
|
पंढरपूर, १ जानेवारी (वार्ता.) – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अनागोंदी कारभाराच्या प्रकरणी मंदिर समितीने भ्रष्टाचार्यांना पाठीशी घातल्याचा धक्कादायक प्रकार दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ३० डिसेंबर या दिवशी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या घेतलेल्या मुलाखतीत उघडकीस आला. या वेळी पुदलवाड यांना प्रसादाच्या लाडवांत झालेला भ्रष्टचार, नियोजनशून्य कारभारामुळे मंदिराचे वाया गेलेले २२ लाख रुपये, कर्मचार्याने हडपलेले साडेसहा लाख रुपये आदींविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना ते ठोस आणि समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.
मंदिर समितीने प्रसादाचे लाडू बनवणार्या भ्रष्ट ठेकेदाराचा ठेका रहित केला; पण गुन्हा नोंदवलाच नाही !
‘श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून देण्यात येणार्या लाडवांचा दर्जा राखला गेला नाही. त्यामध्ये कराराप्रमाणे सुकामेवा वापरला गेला नाही, तसेच शेंगदाण्याच्या तेलाऐवजी सरकीचे तेल वापरले गेले, हे सर्व तुम्हाला मान्य आहे, तर मग ठेकेदाराविरुद्ध गुन्हा का नोंदवला नाही ?’, असा प्रश्न पुदलवाड यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, ‘‘आम्ही ठेकेदाराला नोटीस पाठवली होती, तरीही त्याने आमचे ऐकले नाही. त्यामुळे आम्ही त्याचा ठेका रहित केला, तसेच त्याची २० ते २२ लाख रुपयांची ठेव (डिपॉझिट) त्याला अद्यापही परत दिलेली नाही. त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्याविषयीचा निर्णय मंदिर समिती घेईल.’’ यासह पुदलवाड यांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्या लाखो भाविकांना यापूर्वी निकृष्ट दर्जाचा प्रसाद देण्यात आल्याची स्वीकृती देत ‘सध्या आम्ही भाविकांना चांगल्या दर्जाचे लाडू देत आहोत’, असे सांगितले.
प्रसाधनगृहाचे काम रखडल्याची स्वीकृती; मात्र मंदिर समितीचे लाखो रुपये वाया गेल्याविषयी मौन !
रेल्वे विभागाच्या जागेवर सुलभ शौचालय बांधण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वर्ष २०१७ मध्ये ३५ वर्षांचा करार केला आहे. त्यासाठी १ कोटी ५४ लाख ४६ सहस्र ४१ रुपये निश्चित करण्यात आले. त्यासाठी प्रतीमास ४ लाख ४१ सहस्र ३१५ रुपये खर्च केले; मात्र पुढील ५ वर्षे प्रसाधनगृहाचे बांधकामच केले नाही. मंदिर समितीच्या या नियोजनशून्य कारभारामुळे मंदिर समितीचे २२ लाख रुपयांहून अधिक रक्कम वाया गेली. त्याविषयी विचारले असता पुदलवाड यांनी ‘रेल्वे प्रशासन आणि २ आधुनिक वैद्य यांच्यातील वादामुळे वारकर्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या प्रसाधनगृहाचे काम रखडले. सद्यःस्थितीत हे काम अंतिम टप्प्यात आहे’, असे मोघम उत्तर दिले.
कर्मचार्याने साडेसहा लाख रुपये पळवल्याच्या सूत्राविषयी अधिक बोलण्यास नकार !
‘मंदिरातील औसेकर नावाच्या कर्मचार्याने प्रसादाच्या लाडवांच्या रकमेतील साडेसहा लाख रुपये पळवले. त्याविषयी मंदिर समितीने काय कारवाई केली ?, तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा का नोंदवला नाही ?’, या प्रश्नांवर बालाजी पुदलवाड यांनी ‘हे सूत्र लेखापरीक्षण अहवालामध्ये उपस्थित करण्यात आलेले नाही. हा विषय वेगळा आहे. याविषयी कार्यकारी अधिकारी उत्तर देतील’, असे सांगत याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दूरभाष उचललाच नाही !
लेखापरीक्षकांनी नोंदवलेल्या निरीक्षणांविषयी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची भूमिका जाणून घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या प्रतिनिधीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना २ वेळा दूरभाषवर संपर्क केला; मात्र त्यांनी तो उचलला नाही. समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना दूरभाष केला असता त्यांनी समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना संपर्क करण्यास सांगितले. प्रत्यक्षात राजेंद्र शेळके यांना २ वेळा संपर्क करूनही त्यांनी दूरभाष उचलला नाही.
संपादकीय भूमिका
|