प्रवासी संख्या अल्प असूनही महामेट्रोकडून पुणे मेट्रोच्या फेर्‍या वाढवण्याचा निर्णय !

पुणे – पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मागील काही मासांत घट झालेली आहे. ही प्रवासी संख्या वाढवण्याचे प्रयत्न महामेट्रोकडून चालू आहेत. आता प्रवासी वाढत नसतांनाही मेट्रोच्या फेर्‍या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुबी हॉल ते रामवाडी आणि जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या विस्तारित मार्गावरील सेवा नवीन वर्षापासून चालू होणार होती, ते लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

पुणे मेट्रोची मार्गिका एक पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि मार्गिका दोन वनाझ ते रुबी हॉल या विस्तारित मार्गावरील सेवा १ ऑगस्टपासून चालू झाली, त्यानंतर मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ७० सहस्रांवर पोचली. २ मासांनंतर दैनंदिन प्रवासी संख्येत घसरण होऊन ती आता ५० सहस्रांवर आली आहे. त्यामुळे मेट्रोसमोर प्रवासी संख्या वाढवण्याचे आव्हान आहे.

पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू आहे. सध्या दिवसभरात मार्गिका एकवर ८१ फेर्‍या होत असून नवीन वर्षात १ जानेवारीपासून ११३ फेर्‍या होणार आहेत, तसेच मार्गिका दोनवर ८० फेर्‍या होत असून १ जानेवारीपासून १११ फेर्‍या होणार आहेत, अशी माहिती महामेट्रोने दिली आहे.