काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना जामीन आणि शिक्षा यांची स्थगिती सत्र न्यायालयाने नाकारली !
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचे प्रकरण
नागपूर – नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे सावनेर येथील आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रहित करण्यात आले. त्यानंतर सुनील केदार यांच्या जामीन आणि शिक्षा यांना स्थगिती देण्याच्या याचिकेवरील निकाल सत्र न्यायालयाने राखून ठेवला होता. ३० डिसेंबर या दिवशी निकाल घोषित करत सत्र न्यायालयाने सुनील केदार यांना जामीन आणि शिक्षा यांना स्थगिती नाकारली. यामुळे केदार यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
आता केदार यांचा जामीन आणि शिक्षा यांना स्थगिती देण्याचा निर्णय उच्च न्यायालय घेईल. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने केदार यांच्यासह सर्वच आरोपींना जामीन नाकारला आहे. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर्.एस्. भोसले (पाटील) यांच्यासमक्ष सुनावणी झाली होती. आरोपीविरुद्ध सबळ आणि भक्कम पुरावा असल्याने स्थगिती देण्यात आली नाही, असे सरकारी अधिवक्ता नितीन तेलगोटे यांनी सांगितले. या प्रकरणात अधिवक्ता अजय मिसार यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. त्यांना नितीन तेलगोटे यांनी साहाय्य केले.