भक्तनिवासातील खोल्यांचे दर १ सहस्र ५०० रुपये ते ५ सहस्र ५०० रुपये !

पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जो भाविक येतो, तो मुख्यत्वेकरून सामान्य कुटुंबातील आणि शेतकरी कुटुंबातील असतो. त्यामुळे तेथे आल्यावर त्याची निवासाची सोय ही किमान मूल्यात होणे अपेक्षित आहे. असे असतांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचे दर हे वारकरी आणि सामान्य भाविक यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. ५ खाटांच्या खोलीचा दर १ सहस्र ५०० रुपये, ८ खाटांची खोली २ सहस्र, तर ‘व्हीव्हीआयपी’ (अतीमहनीय) दर्जाची खोली घेतल्यास त्याचा दर ५ सहस्र रुपये इतका प्रचंड आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास वारकर्‍यांसाठी कि पैसेवाल्यांसाठी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(भाग ३)

१. सामान्य भाविकांच्या खिशाला परवडणारे दर हवेत !

श्री. अजय केळकर

कोणत्याही तीर्थक्षेत्री गेल्यावर तेथे येणार्‍या भाविकांना रात्रीच्या निवासाची व्यवस्था ही अल्प मूल्यात होणे अपेक्षित असते. त्यामुळे मंदिर समितीने भक्तनिवास बांधतांना आणि त्याचे दर ठरवतांना ते सामान्य भाविकांच्या खिशाला परवडणारे असेच करणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. केवळ इतकेच नाही, तर चारचाकी गाडीच्या वाहनतळासाठी ७५ रुपये आणि बससाठी १५० रुपये शुल्क भरावे लागेल, असे त्या सूचीत नमूद आहे. शेगाव, श्रीक्षेत्र ओझर यांसह राज्यातील अनेक प्रमुख देवस्थानांमध्ये निवासी रहाणार्‍या भक्तांच्या वाहनतळासाठी कुठेच स्वतंत्र दर आकारण्यात येत नाही. त्यामुळे वाहतनळासाठीही शुल्क आकारून समिती अक्षरश: भाविकांची लूट करत आहे.

भक्तनिवासामधील स्वच्छता, उद्वाहनाची सोय, हवेशीरपणा या सोयी जरी चांगल्या असल्या, तरी या सोयींसाठी आकारण्यात येणारे शुल्क सामान्यांना परवडणारे नाही. पंढरपूरमध्ये सध्या भाविकांचा ओघ प्रचंड प्रमाणात आहे, तसेच लांबून येणार्‍या भाविकांची संख्याही मोठी आहे. येथील काही मठांमध्ये केवळ झोपण्यासाठी ४०० रुपये आकारण्यात येतात. त्यात स्नान, तसेच प्रसाधनगृहाची सोय नसते. त्यामुळे त्यांची आबाळच होते. त्यामुळे भक्तनिवासातील दर हे सामान्य भाविकांच्या खिशाला परवडतील असेच हवे, अशी मागणी सामान्य भाविकांकडून होत आहे.

२. श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाचे दर

३. श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाच्या संदर्भात लेखापरीक्षकांनी नोंदवलेले काही आक्षेप !

अ. मंदिर समितीचे ३ भक्तनिवास असून मनुष्यबळ पुरवणार्‍यांसाठी कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात येत नाही ! ‘बीव्हीजी’ या मनुष्यबळ पुरवणार्‍या आस्थापनाच्या नावे निविदा न काढता केवळ सभेत संमती घेऊन सध्याच्या आस्थापनाचा कालावधी वाढवण्यात येतो.

आ. ‘बीव्हीजी’ या मनुष्यबळ पुरवणार्‍या आस्थापनासाठी लागणारे ‘केमिकल’ हे मंदिर समितीने पुरवावे. त्यासाठी ‘बीव्हीजी’ आस्थापनास प्रतिमाह १ लाख ५४ सहस्र ८०० रुपये (वार्षिक १८ लाख ५७ सहस्र ५०० रुपये) यंत्राचे भाडे म्हणून देते. ते भाडे भरण्यापेक्षा मंदिर समितीने स्वत: अशी यंत्रे खरेदी करावीत.

इ. भक्तनिवासात ‘अश्विनी महिला बचतगट’ या स्वतंत्र उपाहारगृह चालवत आहेत. या बचतगटाला कोणतेही स्वतंत्र अनुमती पत्र (वर्क ऑर्डर) मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलेले नाही. या उपाहारगृहातील आणि बाहेरील दर यांत तफावत असून अन्नाच्या गुणत्तेविषयीही तक्रारी आहेत. त्यामुळे ‘अश्विनी महिला बचतगटा’च्या ऐवजी मंदिर समितीने स्वत:चे अन्नछत्र चालू करावे.

या संदर्भातील अनुपालन अहवालात मंदिर समितीने ‘भक्तनिवासासाठी ‘इ-निविदा’ प्रक्रिया राबवत आहोत, तसेच मंदिर समितीच्या वतीने भक्तनिवासासाठी स्वतंत्र अन्नछत्र चालू करण्याची आवश्यकता वाटत नाही आणि ‘अश्विनी महिला बचतगट’च्या गुणवत्तेसाठी अन् दरासाठी त्यांना ‘नोटीस’ देण्यात आलेली आहे’, असे नमूद केले आहे.

(समाप्त)

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर (३१.१२.२०२३)

‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’च्या लेखापरीक्षणात लेखापरीक्षकांनी नोंदवलेले गंभीर आक्षेप !

वाहनांचे ‘लॉग बूक’ वेळच्या वेळी भरले जात नाही अन् वाहनांची आतापर्यंत ‘घसार्‍याची नोंद’ केलेली नाही !

‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’च्या लेखापरीक्षणात लेखापरीक्षकांनी विविध विभागांच्या संदर्भात गंभीर सूत्रे नोंदवलेली आहेत. यात वाहन विभागाविषयी नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांमध्ये प्रामुख्याने ‘वाहनांचे ‘लॉग बूक’ (वाहनांची नोंदवही) वेळच्या वेळी भरले जात नाही. या सर्व वाहनांवर आतापर्यंत ‘घसार्‍याची नोंद (डेप्रिसिएशन चार्ज)’ केलेली नाही. सुरक्षा विभागाविषयी स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षक या पदावरती काम करणार्‍या बर्‍याच सेवकांची ‘के.वाय्.सी.’ कागदपत्रे (ओळख पटवण्यासाठीची कागदपत्रे) घेण्यात आलेली नाहीत’, असे नमूद केले आहे.

लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर मंदिर समितीने ‘लॉग बूक’संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करत आहोत, तसेच सर्व सेवकांची  ‘के.वाय्.सी.’ पूर्ण केली आहेत’, असे अनुपालन अहवालात नमूद केले आहे.

रोख रक्कम मोजण्यासाठीच्या खोलीबाहेर सुरक्षारक्षक नाही !

समितीला ज्या श्रद्धेने भाविक दान देतात, त्या रकमेचा विनियोग आणि त्याची सुरक्षा अतिशय योग्य रितीने होणे अपेक्षित आहे; कारण भाविक ते मोठ्या विश्वासाने देत असतात. असे असतांना ‘रोख रक्कम मोजण्यासाठी ती ज्या खोलीत ठेवली जाते, त्या खोलीच्या बाहेर सुरक्षारक्षक नसतो’, असे लेखापरीक्षकांनी नमूद करून ‘या खोलीत आवक-जावक नोंदवही नाही’, असेही नमूद केले आहे. या सर्वांवर समितीच्या वतीने ‘आता कृती करत आहोत’, असे उत्तर दिले आहे !

– श्री. अजय केळकर (३१.१२.२०२३)

संपादकीय भूमिका

पंढरपूर येथल श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास वारकर्‍यांसाठी कि पैसेवाल्यांसाठी ?