Russia Ukraine War : युक्रेनने रशियातील शहरावर क्लस्टर बाँबद्वारे केलेल्या आक्रमणात २१ जण ठार
युक्रेनचे रशियाला जोरदार प्रत्युत्तर !
मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनवर केलेल्या सर्वांत मोठ्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून युक्रेननेही रशियातील बेलगोरेड शहरावर जोरदार आक्रमण केले. यात रशियाच्या २१ जणांचा मृत्यू झाला, तर १११ जण घायाळ झाले. युक्रेनने क्लस्टर बाँबद्वारे हे आक्रमण केल्याचा दावा रशियाने केला आहे. बेलगोरेड हे शहर युक्रेनच्या सीमेपासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर आहे. या आक्रमणाचा सूड उगवणार असल्याचा निर्धार रशियाने व्यक्त केला आहे. रशियाने युक्रेनचे ३२ ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.
काय आहे क्लस्टर बाँब ?
क्लस्टर बाँब हवेत सोडल्यावर त्यातून अनेक छोटे बाँब बाहेर पडतात. हे छोटे बाँब सामान्य बाँबपेक्षा अधिक क्षेत्र प्रभावित करतात. बहुतांश घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिकही त्यांना बळी पडतात. हे लढाऊ विमानांद्वारे आकाशातून डागता येतात आणि तोफांच्या माध्यमातून भूमीवरूनही डागता येतात. या बाँबचा स्फोट झाल्यानंतर जवळ पडणारी छोटी स्फोटके बराच काळ आजूबाजूला पडून राहू शकतात. अशा परिस्थितीत युद्ध संपल्यानंतरही त्यांच्या संपर्कात आल्यास एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. हे शत्रू सैनिकांना मारण्यासाठी किंवा त्यांच्या वाहनांची हानी करण्यासाठी वापरले जातात.