राज्यभरात ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम’ राबवण्यात येईल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हाती झाडू घेऊन मुख्यमंत्र्यांचा ठाणे येथील रस्ते स्वच्छता मोहिमेत सहभाग !
ठाणे, ३० डिसेंबर (वार्ता.) – ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, तरच ठाणे निरोगी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहीम ३० डिसेंबरपासून ठाणे येथून चालू झाली. या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती झाडू घेऊन रस्त्याची स्वच्छता करण्यास आरंभ केला. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचारी रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी उतरल्याचे पहायला मिळाले. ‘टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ठाणे ते दिवा या शहरांत एकूण ९ प्रभाग समित्या आहेत. त्या सर्व प्रभाग समित्यांच्या क्षेत्रांत सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा आरंभ वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक २२ मधून झाला. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी लोकप्रतिनिधी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते.