संतांकडे लोक का आकर्षिले जातात ?

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘आत्मज्ञानाचा, आत्मसाक्षात्काराचा महिमा अद्भुत आहे. संपूर्ण पृथ्वी धनसंपत्तीने भरूनही, सगळी वसुंधरा ही जरी आत्मज्ञान देणार्‍याला दिली, तरी त्याचे मोल होणार नाही. आत्मसाक्षात्कारी पुरुषाला ‘संत’ म्हणतात. संतांकडे लाेक आकर्षिले जातात; कारण तेथे लोक धनाकरता जात नाहीत. बहुधा संतांजवळ धन नसतेच. संत दरिद्रीच असतात. ते अगदीच अकिंचन असतात. ते साहित्यिक असतात, शैलीदार लिहितात किंवा बोलतात, असेही नाही. ते पंडित असतील किंवा नसतील. ते धनवान असतील किंवा नसतील. कुलवान असतील किंवा नसतील, तरीही लोक संतांकडे खेचले जातात; कारण आंतरिक ओढ असते. ती बाहेर नसते. संत शास्त्र वाचलेले असतील किंवा नसतील, त्यांना संस्कृत येत असेल किंवा नसेल, प्राकृतही धड येत नसेल, बहुभाषी नसेल; पण ते स्वत:ला, क्षेत्रज्ञाला आणि परमात्म्याला जाणतात. त्या जाणण्यातच सगळे येते. ते भगवत्तेला प्राप्त होतात. भगवत्तेत सगळे सामावते. लोक भगवत्तेमुळे त्यांच्याकडे खेचले जातात. ते आंतरिक संबंध जोडतात. ते क्षेत्रज्ञाशी अंतरात्म्याशी मिळून जातात. आत्मज्ञानात, भगवत्तेत सगळे सामावले आहे. क्षेत्रज्ञाला जाणले की, मग सगळे जाणले जाते. नंतर जाणायचे काही उरतच नाही.

क्षेत्रज्ञाचा-आत्म्याचा-परमात्म्याचा साक्षात्कार, भगवत्ता हेच संतांचे सामर्थ्य ! हीच त्यांची शक्ती; म्हणूनच ते सगळ्या विश्वावर अपार प्रेम करू शकतात. क्षेत्रज्ञाचा परमात्म्याचा साक्षात्कारच सर्व विश्वावर अपरंपार प्रेम करायची शक्ती देतो. सगळे विश्वही त्यांच्यावर अपार प्रेम करते. त्यांच्या सान्निध्यात विश्व कृतार्थ होते.’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२२)