साधकाने अध्यात्मात मुरायला हवे !
‘लोणचे किंवा मुरंबा मुरला की, तो अधिक चांगला लागतो. ‘मुरणे’ म्हणजे लोणच्यातील कैरीच्या फोडीमध्ये तेल आतपर्यंत जाणे किंवा आंब्याच्या फोडीमध्ये साखरेचा पाक आतपर्यंत जाणे. त्यामुळे त्या फोडींचा कडकपणा न्यून होतो. त्याप्रमाणेच साधना करणार्याने अध्यात्मात मुरले पाहिजे. याचा अर्थ साधकाने स्वभावदोष आणि अहं दूर करून नरम बनले पाहिजे. तसेच साधकाच्या प्रत्येक कृतीमध्ये अध्यात्म दिसून आले पाहिजे. साधक अध्यात्मात मुरला की, त्याला कुणाकडून अपेक्षा उरत नाहीत. कुणी काही बोलले, तरी राग येत नाही. कोणतीही गोष्ट मिळाली नाही, तरी दुःख वाटत नाही. तसेच कोणत्याही संकटाचे किंवा दायित्वाचे भय वाटत नाही. त्याची गुरूंवर दृढ श्रद्धा असते. त्यामुळे तो साधक सतत आनंदी असतो.
तो साधक बाह्य गोष्टींकडे न बघता नेहमी आध्यात्मिक स्तरावर रहातो. आपल्याला अध्यात्मातील काय मिळाले ? याकडे तो लक्ष देतो, उदा. गुरूंकडून कौतुक म्हणून खाऊ मिळाल्यावर त्या स्थुलातील घटकाकडे न पहाता त्या खाऊतून मिळालेल्या आशीर्वादाकडे पहातो. तसेच एखादी गोष्ट सुचली, तर ‘गुरूंनी दिलेले ज्ञान आपण त्यांच्याच कृपेने ग्रहण करू शकलो’, असा त्याचा भाव असतो. त्यामुळे साधकाचा कर्तेपणा उरत नाही. ‘प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी काळ अनुकूल पाहिजे आणि आपले कष्टही फळाला आले पाहिजेत’, हे तो जाणत असल्याने त्याच्यात उतावीळपणा अन् अस्वस्थता रहात नाही. त्याची वृत्ती शांत बनते. अशा प्रकारे अध्यात्मात मुरणे, म्हणजे साधनेत रमणे. हेच साधकाच्या जीवनात अपेक्षित आहे !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.१०.२०२३)