परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नियोजनबद्ध सेवा करायला शिकवल्यामुळे चुका टळून सेवेची फलनिष्पत्ती वाढल्यामुळे साधनेत प्रगती होणे
१७ डिसेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या लेखात ‘साधकांच्या मनातील शंकांचे पूर्ण समाधान करून आणि अध्यात्मातील सिद्धांत वैज्ञानिक भाषेत मांडून साधकांना साधनेत अग्रेसर करणारे अद्वितीय महान परात्पर गुरु डॉ. आठवले’, याविषयी वाचले. आजच्या भागात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नियोजनबद्ध सेवा करायला शिकवल्यामुळे साधनेत प्रगती करायला कसा लाभ झाला ?’, ते दिले आहे.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/746429.html
१. सामूहिक प्रसाराची अद्वितीय कल्पना !
१ अ. सामूहिक प्रसार मोहिमेसाठी केली जाणारी पूर्वसिद्धता : ‘वर्ष २००० मध्ये आठवड्यातील प्रत्येक रविवारी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवण्याची मोहीम, सनातनचे ग्रंथ आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे वितरण’ यांसाठी सामूहिक प्रचार असायचा. त्यासाठी त्याची पूर्वसिद्धता केली जायची.
१. प्रत्येक आठवड्याला ‘ठाणे शहरातील कुठल्या भागात प्रचार करायचा ?’, हे उत्तरदायी साधक आधीच ठरवायचे. ते प्रचाराचे ६ मासांचे नियोजन करायचे.
२. ज्या ठिकाणी प्रचार करायचा आहे, तेथील साधकांना मोहिमेचा दिनांक आधी कळवला जायचा. त्यामुळे तेथील साधक त्या भागातील मार्ग, गृहनिर्माण संकुल, चाळी इत्यादींचा सखोल अभ्यास करून ‘स्थानिक परिस्थितीनुसार कुठल्या भागात प्रचार चांगला होईल ?’, याचा सखोल अभ्यास करायचे.
३. या मोहिमेत ५० ते १०० पर्यंत साधक सहभागी असायचे. उपलब्ध साधकांनुसार ‘एकूण किती गट करायचे ?’ आणि ‘कुठल्या गटाला कुठे पाठवायचे ?’, याचे सर्व नियोजन कागदावर लिहून सिद्ध केले जायचे.
४. प्रचार आणि वितरण यांसाठी लागणारे सनातनचे ग्रंथ, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार बनवण्यासाठी लागणारी पावती पुस्तके यांची आधीच मागणी करून त्यांचे प्रत्येक गटासाठी गठ्ठे सिद्ध केले जायचे.
५. प्रचाराच्या वेळी कुणाला काही प्रचारसाहित्य न्यून पडल्यास ते घेण्यासाठी एका ठिकाणी वितरणकक्ष लावला जायचा.
६. साधकांना दुपारी जेवायला बसण्यासाठी त्या भागात रहाणार्या एखाद्या साधकाचे घर मोठे असल्यास तिथे किंवा एखादे मंदिर किंवा त्या भागातील शाळेचा एखादा वर्ग येथे व्यवस्था केली जायची.
१ आ. प्रत्यक्ष प्रचार
१. साधकांना ‘त्यांनी त्यांच्या गटानुसार कुठल्या विभागात प्रचारासाठी जायचे आहे ?’, हे आधीच सांगितले जायचे. त्यामुळे सकाळी ८ किंवा ९ वाजल्यापासून प्रचार करायला आरंभ होई.
२. घरोघरी जाऊन लोकांना साधना सांगणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वर्गणीदार करणे, सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगून त्याचे वितरण करणे’, अशा सेवा केल्या जायच्या.
३. दुपारी जेवणासाठी सर्व जण एकत्र यायचे. जेवणामध्ये केवळ खिचडी, ताक आणि लोणचे असायचे. (टीप)
(टीप : यातून प.पू. डॉक्टरांची दूरदृष्टी लक्षात आली. ‘खाण्या-पिण्याचे नियोजन आणि स्वयंपाक करणे’, यांत साधकांचा वेळ जाऊ नये, पुढे येणार्या आपत्काळाची आतापासून सिद्धता व्हावी, साधकांची आवड-नावड न्यून व्हावी आणि त्यांचा अधिकाधिक वेळ प्रचारसेवेसाठी वापरला जावा’, यांसाठी पूर्वीपासून ते गुरुपौर्णिमा उत्सव किंवा सत्संग सोहळे अशा कार्यक्रमांसाठीही केवळ खिचडी, ताक आणि लोणचे एवढेच पदार्थ जेवणासाठी ठेवायला सांगत असत.
रविवारी बहुतेकांच्या घरी विशेष चमचमीत पदार्थ केले जातात; पण गुरुसेवेसाठी साधकांनी खाण्या-पिण्याची आवड-नावड यांचा त्याग केला. साधनेच्या आरंभीच्या टप्प्यात असा त्याग करणे अवघड असते; परंतु सेवेतून मिळणार्या आनंदामुळे साधकांना ते शक्य झाले.)
४. जेवणानंतर सकाळी झालेल्या प्रचाराचा आढावा व्हायचा. त्यानंतर काही सूचना दिल्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा प्रचाराला आरंभ व्हायचा.
५. सायंकाळी प्रचार थांबवल्यावर सर्वांचा आढावा होऊन दिवसभरात झालेल्या वितरणाचा हिशोब होईपर्यंत संध्याकाळचे ७ ते ८ वाजायचे.
२. प्रचार मोहिमेचा झालेला लाभ !
अ. नोकरीला जाणारे आणि विद्यार्थी साधक यांना या प्रचार मोहिमेचा पुष्कळ लाभ व्हायचा; कारण रविवारी असलेल्या या मोहिमांमुळे त्यांच्या सुटीचा दिवस पूर्णपणे साधना करण्यासाठी वापरला जायचा.
आ. प्रचारसेवा जवळजवळ वर्षभर चालू असायची. त्यामुळे साधकांना अधिकाधिक काळ सत्मध्ये रहाण्याची सवय झाली.
इ. सर्व साधकांच्या एकमेकांशी ओळखी होऊन त्यांना एकमेकांकडून शिकता आले आणि त्यांचा एकमेकांविषयीचा प्रेमभावही वाढला.
ई. ‘नेतृत्व गुण कसा असला पाहिजे ?’ आणि ‘साधकांशी जवळीक कशी करावी ?’, हेही शिकता आले.
३. देवाचे साहाय्य घेण्याचे महत्त्व मनावर बिंबणे
३ अ. सेवेचे नियोजन करता न येणे, तेव्हा श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना केल्यावर नियोजन करतांना अनेक सूत्रे सुचणे : साधनेत येण्यापूर्वी माझ्यामध्ये नियोजन कौशल्य नव्हते. साधनेत आल्यावर ‘प्रत्येक सेवेचे नियोजन करायला हवे’, हे माझ्या लक्षात आले; पण आरंभी मला नियोजन करायला जमत नव्हते. तेव्हा सहसाधक आणि उत्तरदायी साधक मला प्रार्थना करायला सांगायचे. श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांना शरण जाऊन प्रार्थना केल्यावर मला अनेक सूत्रे सुचायची. तेव्हा ‘बौद्धिक स्तरावर नियोजन करणे वेगळे आणि आध्यात्मिक स्तरावर नियोजन करणे वेगळे आहे’, हे माझ्या लक्षात आले.
३ आ. ‘देवाचे साहाय्य घेऊन नियोजन केल्यावर कुठल्याही कृतीचे नियोजन करता येऊन ती परिपूर्ण होते’, हे शिकता येणे : आपल्याला ज्या क्षेत्राविषयी ज्ञात असते, त्या क्षेत्रात ‘बौद्धिक स्तरावरचे नियोजन’, करता येते; परंतु देवाचे साहाय्य घेतल्यावर, म्हणजेच ‘कृतीला भावाची जोड दिल्यावर आपण कुठल्याही कृतीचे नियोजन करू शकतो’, असे माझ्या लक्षात आले. यावरून ‘परिपूर्ण नियोजन करायचे असेल, तर देवाचे साहाय्य घेणे आवश्यक आहे’, हे माझ्या मनावर बिंबले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना नियोजनबद्ध सेवा करायला शिकवल्यामुळे झालेले लाभ !
४ अ. साधकांना प्रचारसेवेच्या नियोजनातील शिकायला मिळालेले अनेक बारकावे ! : परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली प्रचाराची ही अभिनव कल्पना सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जात असे. त्यामुळे सर्व ठिकाणच्या बर्याच साधकांना नियोजनातील अनेक बारकावे शिकायला मिळाले, उदा. ‘इतक्या मोठ्या प्रमाणावर साधकांचे नियोजन कसे करायचे ?’, ‘पूर्वसिद्धता करतांना सर्व नियोजन कागदावर लिहिणे किती आवश्यक आहे ?’, ‘कधी साधकसंख्या उणे-अधिक झाल्यास काय करायचे ?’, ‘सेवेसाठी साधकांना कसे प्रेरित करायचे ?’, ‘अनेक साधक सेवेसाठी आल्यावर त्यांच्याशी कसे बोलायचे ?’, ‘वेगवेगळ्या प्रकृतींशी कसे जुळवून घ्यायचे ?’, ‘सेवेची वेळ ठरलेली असली, तरी काही वेळा अडचणींमुळे काही साधक विलंबाने यायचे, त्यांना कुठल्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या ?, ‘प्रचार करणार्या साधकांचे जेवण किंवा सायंकाळचे चहा-पाणी यांची व्यवस्था करायला हवी’, इत्यादी.
४ आ. साधकांच्या मनावर ‘प्रत्येक सेवेचे नियोजन करायला हवे’, असा संस्कार होणे : ‘सण-उत्सवाच्या वेळी ग्रंथप्रदर्शन लावणे किंवा प्रवचनाचे आयोजन करणे, सत्संगाचा प्रचार करणे’, अशा सेवांच्या आधी त्या सेवेतील साधक एकत्र येऊन नियोजन करायचे. त्यामुळे ‘प्रत्येक सेवा नियोजन करूनच करायला हवी’, असा संस्कार साधकांवर झाला.
४ इ. नियोजनबद्ध सेवेमुळे सेवा सहजतेने आणि चुकांविरहित होणे : प.पू. गुरुदेवांनी सर्व सेवा नियोजनबद्ध करण्याची जी कार्यपद्धत घातली होती, त्यामुळे ‘सेवा करतांना ऐन वेळी धावपळ न होता ताणविरहित आणि चुकांविरहित सेवा होते’, हे शिकता आले.
यातून प.पू. डॉक्टरांनी ‘सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण कशी करायची ?’, याचा परिपाठच साधकांना घालून दिला आहे.
४ ई. लहान गोष्टींचे नियोजन करण्याची सवय लागल्यामुळे व्यवहारातील कामे आणि पुढे साधनेमध्ये मोठ्या सेवा यांचे नियोजन करतांना सोपे जाणे : लहान लहान गोष्टींचे नियोजन करायची सवय लागल्यामुळे मला व्यवहारातील कामे आणि पुढे साधनेमध्ये मोठ्या सेवा यांचे नियोजन करता आले, उदा. समाजात मोठ्या प्रमाणावर धर्मजागृती करणार्या ‘हिंदु धर्मजागृती सभां’चे आयोजन करणे, राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या विरोधातील जागृती करणारे प्रदर्शन किंवा क्रांतीकारकांविषयी माहिती देणारे प्रदर्शन लावणे इत्यादी.
५. नियोजनबद्ध सेवा केल्यामुळे सेवांची फलनिष्पत्ती वाढणे
प.पू. डॉक्टर म्हणतात, ‘‘ईश्वर परिपूर्ण आहे. त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचे आहे, तर त्याचे सर्व गुण आपल्यात आले पाहिजेत. ईश्वर ब्रह्मांडाचा कारभार अतिशय नियोजनबद्धपणे चालवतो. त्यामुळे आपल्यातही नियोजनकौशल्य हा गुण येणे आवश्यक आहे.’’ त्यामुळे आता कुठलाही साधक कुठलीही सेवा करण्याआधी त्याचे नियोजन करतो. परिणामस्वरूप सनातन संस्थेमध्ये साधकसंख्या अल्प असूनही उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे समष्टीतील मोठे कार्यक्रमही निर्विघ्न पार पडतात आणि सेवांची फलनिष्पत्ती वाढते.
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी नियोजनकौशल्य शिकवल्यामुळे सेवेची फलनिष्पत्ती वाढली. त्यामुळे साधनेत प्रगती झाली’, असे मला वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञतेच्या भावाने त्यांच्या चरणी अर्पण !
(क्रमशः पुढच्या रविवारी)
इदं न मम ।’(अर्थ : हे लिखाण माझे नाही.)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.१.२०२३)
संत अधिकतर तात्त्विक भाग सांगतात, तर गुरु प्रायोगिक भाग शिकवतात ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |