विशाळगडावरील १६८ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचे प्रावधान ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
काही लोकांच्या डोक्यातील अफझलखानाचा ‘व्हायरस’ बाहेर काढण्यासाठी ‘वाघनखे’ महाराष्ट्रात आणावी लागण्याचे प्रतिपादन
सांगली, ३० डिसेंबर (वार्ता.) – प्रतापगडाप्रमाणे राज्यातील गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण हटवून गडांना गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील १६८ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी वन विभागाकडून १ कोटी १७ लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. काही लोकांच्या डोक्यात अफझलखानाचा ‘व्हायरस’ असून तो बाहेर काढायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढलेली ‘वाघनखे’ महाराष्ट्रात आणावी लागतील, असे प्रतिपादन राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्याभोवती वन विभागाच्या जागेवर अफझलखानाच्या भक्तांनी केलेले अनधिकृत बांधकाम बुलडोझर लावून भुईसपाट करायचा धाडसी निर्णय घेतल्याविषयी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ‘श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’च्या वतीने भगवा फेटा, शाल, गदा, हार आणि अफझलखानवधाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. २९ डिसेंबर या दिवशी येथील कच्छी जैन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
तत्कालीन शासनकर्त्यांनी मतांसाठी प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश दिला नाही ! – नितीन शिंदे, माजी आमदार या वेळी बोलतांना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, अफझलखानवधाच्या जागेभोवती करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ३ वेळा दिला होता. तरीही तत्कालीन शासनकर्त्यांनी मतांसाठी हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश दिला नाही; परंतु सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आम्ही ही मागणी केल्यानंतर त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता तात्काळ थडग्या भोवतीचे संपूर्ण अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देऊन ‘तिथे एक वीटही शिल्लक ठेवू नका’, असे सांगितले. कार्यक्रमात स्वागत आणि प्रास्ताविक करतांना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अधिवक्त्या स्वाती शिंदे यांनी श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने केलेल्या २३ वर्षांच्या लढ्याचा इतिहास सांगितला. अफझलखान आणि सय्यद बंडाच्या थडग्याभोवती झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात नितीन शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. याविषयी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वांचेच कौतुक केले. |
उपस्थित मान्यवर…
पालकमंत्री सुरेश खाडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजप महिला आघाडीच्या नीताताई केळकर, पैलवान पृथ्वीराज पवार, हनुमंत पवार, विष्णुपंत पाटील, संजय जाधव, सिद्धार्थ गाडगीळ, ओंकार शुक्ल यांच्यासह भाजप, शिवसेना, हिंदु एकता आंदोलन, श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, सकल हिंदु समाज सांगलीच्या पदाधिकार्यांसह शिवभक्त बंधू-भगिनी |