देशाची ‘सेक्युलर’ शब्दामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ आवश्यक ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
तळसर (ता. चिपळूण) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान
चिपळूण, ३० डिसेंबर (वार्ता.) – आपला देश हिंदूबहुल असूनही आपल्याला ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करावी लागते. वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. त्यातून पाकिस्तान इस्लामी राष्ट्र निर्माण झाले; मात्र उर्वरित भारत ‘हिंदु राष्ट्र’ न होता त्याला निधर्मी देश बनवण्यात आले. जगात एकही देश निधर्मी नाही. भारताने स्वीकारलेल्या मूळ राज्यघटनेत ‘सेक्युलर’ हा शब्द नव्हता. तो आणीबाणीच्या काळात राज्यघटनेत घुसडण्यात आला. या शब्दामुळे देशात ‘आतंकवाद’, ‘धर्मांतरण’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘मंदिर सरकारीकरण’, ‘देशविरोधी विचारसरणी’ अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. ‘सेक्युलर’ शब्दामुळे राष्ट्र आणि धर्म यांची मोठी हानी झाली आहे. ही हानी भरून काढण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना आवश्यक आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले. तालुक्यातील तळसर शिर्केवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सचिन सकपाळ यांनी केले. या वेळी श्री. प्रकाश राजेशिर्के, श्री. सुरेंद्र राजेशिर्के, श्री. अरुण राजेशिर्के, श्री. फत्तेसिंग राजेशिर्के, श्री. मनोहर जाधव उपस्थित होते. या प्रवचनाचा लाभ ४० धर्मप्रेमी ग्रामस्थांनी घेतला.
श्री. सुरेश शिंदे पुढे म्हणाले की, ‘सेक्युलर’ व्यवस्थेमुळे देशातील श्रद्धास्थाने, परंपरा यावर आघात केले गेले. ‘परकीय आहे ते चांगले आणि भारतीय म्हणजे टाकाऊ’ अशी भावना जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हिंदूंचे आचार, विचार, कृती यांमधून पाश्चिमात्यांचे अंधानुकरण झाले. ‘हिंदु राष्ट्रा’साठी धर्माचरणी समाज निर्माण होणे आवश्यक आहे. आपण धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्या अर्थाने धर्माचे आणि आपले रक्षण होईल. साधनेमुळे मनोबळ वाढते, आत्मशक्ती जागृत होते.
विशेष : या प्रवचनानंतर धर्मशिक्षणवर्गाची मागणी करण्यात आली. यातील पहिला वर्ग ३१ डिसेंबर या दिवशी होणार आहे.
अभिप्राय :
सौ. दीपिका दिलीप राजेशिर्के, अंगणवाडी सेविका – हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनानुसार कृती करू. त्यातून चांगले विचार आणि गुण निर्माण होतील.