#Exclusive : तत्कालीन पुजार्‍यांनी दागिन्यांची रीतसर सूची देऊनही मंदिर समितीने ३८ वर्षांपासून दागिन्यांची माहिती लपवली !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीचे प्राचीन दागिने गहाळ झाल्याची दाट शक्यता !

पंढरपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे वर्ष १९८५ मध्ये सरकारीकरण करतांना तत्कालीन पुजारी बडवे आणि उत्पात यांनी सरकारकडे देवतांचे सर्व दागिने आणि त्याची रीतसर सूची सादर केली होती; मात्र श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मागील ३८ वर्षांपासून ही माहिती लपवल्याचे समोर आले आहे.

वर्ष १९८५ ते २००९ या २३ वर्षांत लेखापरीक्षण अहवाल सादर केलेच नाहीत !

सरकारीकरण झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने सरकारला वर्ष १९८५ ते २००९ या २३ वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेलेच नाहीत. पंढरपूर येथील श्री. भीमाचार्य वरखेडकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीतून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

वेळोवेळी सूचना देऊनही मंदिर समितीकडून दागिन्यांचे लेखापरीक्षण नाही !

विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वर्ष २०२१-२२ चा सरकारचा आर्थिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात आले नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. वर्ष २०१७ पासूनचे सरकारचे आर्थिक लेखापरीक्षण अहवाल पहाता त्यांमध्ये ‘देवतांच्या प्राचीन मौल्यवान दागिन्यांचे लेखापरीक्षण करावे’, अशी स्पष्ट सूचना लेखापरीक्षकांनी मंदिर समितीला दिली आहे; परंतु तरीही मंदिर समितीने दागिन्यांचे मूल्यांकन केलेले नाही. हे सर्व अहवाल दैनिक ‘सनातन प्रभात’कडे उपलब्ध आहेत.

वर्ष २०१५ ते २०१८ पर्यंतचे ‘अनुपालन अहवाल’ देण्यास विलंब !

(‘अनुपालन अहवाल’ म्हणजे लेखापरीक्षण अहवालावर धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या सूचना होय. त्यांवर काय कार्यवाही केली ?, त्याचा अहवाल संबंधित संस्थेला सरकारकडे सादर करावा लागतो.)

लेखापरीक्षकांनी वर्ष २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षांतील लेखापरीक्षण अहवालांमध्ये दागिन्यांचे मूल्यांकन करण्याची सूचना दिली होती. तथापि यांवरील अनुपालन अहवाल मंदिर समितीने वेळेत सादर केलेले नाहीत. वर्ष २०१८-१९ च्या लेखापरीक्षण अहवालामध्ये वरील तीनही वर्षांचे अनुपालन अहवाल देण्यात आले नसल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर समितीचा हा कारभार अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

छत्रपती शिवरायांच्या काळापासूनच्या मौल्यवान दागिन्यांचा समावेश !

श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवी यांना छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, तत्कालीन संस्थानिक आदींनी मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत. यामध्ये श्री विठ्ठलाचा हिर्‍यांचा मुकुट, हिर्‍यांचे पैंजण, श्री विठ्ठलाची सोन्याची तुळशीची माळ, सोन्याचे गोफ आदी मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. वर्ष २०२१-२२ च्या आर्थिक अहवालामध्ये श्री विठ्ठलाचे २०३, तर श्री रुक्मिणीदेवीचे १११ दागिने असल्याचा उल्लेख आहे; परंतु दागिन्यांचा तपशील देण्यात आलेला नाही. यापूर्वीच्या लेखापरीक्षण अहवालांमध्ये तर दागिन्यांची संख्याही देण्यात आलेली नाही.

देवस्थानाचे गुळमुळीत उत्तर आणि काही अनुत्तरित प्रश्‍न !

या दागिन्यांच्या नोंदी देवस्थानाच्या अंतर्गत नोंदवहीत (‘रजिस्टर’मध्ये) नोंदवण्यात आल्याचे गुळमुळीत उत्तर देवस्थानाकडून देण्यात येत आहे; मात्र सरकारीकरण झालेल्या मंदिराच्या दागिन्यांचा तपशील सरकारला का सादर करण्यात आला नाही ? त्यांचे मूल्यांकन का केले नाही ? आणि ताळेबंदामध्ये त्यांच्या नोंदी का नाहीत ? हे प्रश्‍न अद्यापही अनुत्तरित आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीचे सर्व दागिने सुरक्षित ! – बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

बालाजी पुदलवाड

‘श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीचे सर्व प्राचीन दागिने सुरक्षित आहेत. त्यांतील एकही दागिना गहाळ झालेला नाही. ‘दागिने प्राचीन असल्यामुळे त्यांचे मूल्यांकन करणे अतिशय कठीण आहे’, असे आमचे मत आहे. हे मूल्यांकन करण्यासाठी अधिकारी हवा असल्याचे पत्र आम्ही सरकारला दिले आहे. लेखापरीक्षकांनी अहवालामध्ये सांगितलेल्या सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रसादाच्या लाडवांमध्ये दर्जा न राखल्याप्रकरणी संबंधित बचतगटाचा ठेका रहित करण्यात आला असून सध्या मंदिर समिती चांगल्या दर्जाचे लाडू तयार करत आहे’, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

संपादकीय भूमिका 

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी ती भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत !