रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अमेरिकेत साजरा होणार !
हिंदूंकडून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
वॉशिंग्टन – अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार्या श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याविषयी अमेरिकेतील हिंदु समुदाय पुष्कळ उत्सुक आहे. येथील हिंदु अमेरिकन नागरिकांनी हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. हा ऐतिहासिक प्रसंग अमेरिकेतील मंदिरांमध्ये आठवडाभर साजरा केला जाणार आहे. अलीकडेच राममंदिराच्या उद्घाटनाचा उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने हिंदु समुदायाने १६ डिसेंबर या दिवशी वॉशिंग्टन डीसीच्या उपनगरात वाहनफेरी काढली होती. विश्व हिंदु परिषदेची अमेरिकेतील शाखा उत्सवाचे नेतृत्व करत आहे.
१. ‘हिंदु टेम्पल एम्पॉवरमेंट कौन्सिल’च्या तेजल शहा म्हणाल्या, ‘‘आम्ही या ऐतिहासिक कार्यक्रमाचा एक भाग आहोत, हे आमचे भाग्य आणि श्रीरामाचा आशीर्वाद आहे. शतकानुशतकांची प्रतीक्षा आणि संघर्ष केल्यानंतर आमचे स्वप्न साकार होत आहे. अमेरिका आणि कॅनडा येथील प्रत्येक हिंदू भावविभोर झाला आहे. प्रत्येकाच्या मनात आदराची भावना आहे आणि ते भगवान श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची वाट पहात आहेत.’’
२. ‘हिंदु टेम्पल एम्पॉवरमेंट कौन्सिल’ ही अमेरिकेतील १ सहस्र १०० हिंदु मंदिरांची सर्वोच्च संस्था आहे. ‘श्रीराममलाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा भारतात चालू असतांना अमेरिकी वेळेनुसार २१ जानेवारीला रात्री ११ वाजताची आम्ही या सोहळ्यात ‘ऑनलाईन’ सहभागी होणार आहोत’, असे शहा यांनी सांगितले.