२२ जानेवारीला ‘रामज्योती’ प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा ! – पंतप्रधान मोदी
|
अयोध्या (उत्तरप्रदेश) – हा ऐतिहासिक क्षण आपल्या आयुष्यात सुदैवाने आला आहे. मी भारताच्या १४० कोटी देशवासियांना हात जोडून प्रार्थना करत आहे. २२ जानेवारीला प्रभु श्रीराम जेव्हा श्रीराममंदिरात विराजमान होतील, तेव्हा ‘रामज्योती’ प्रज्वलित करा. दिवाळी साजरी करा. २२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही. येथील संपूर्ण कार्यक्रमानंतर कुटुंबासह अयोध्येला नक्की या. आपण ५५० वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस पहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. अयोध्येतील ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ आणि अयोध्या रेल्वे स्थानक यांच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी दलित व्यक्ती असलेली धनीराम मांझी यांच्या घरी जाऊन चहा घेतला. पंतप्रधानांनी अयोध्येत ८ किलोमीटर लांबीचा ‘रोड शो’ केला. त्यांनी अयोध्या आणि इतर स्थानकांवरून धावणार्या २ ‘अमृत भारत’ अन् ६ ‘वन्दे भारत’ एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
सौजन्य एएनआय
आज संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पहात आहे !
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, एक काळ असा होता की, अयोध्येत रामलला तंबूत विराजमान होते. आज केवळ रामललालाच पक्के घर मिळालेले नाही, तर देशातील ४ कोटी गरीब जनतेलाही मिळाले आहे. आज संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पहात आहे. मी भारतातील मातीच्या प्रत्येक कणाचा आणि माणसांचा पुजारी आहे. मलाही तितकीच उत्सुकता आहे. हाच उत्साह आज अयोध्येच्या रस्त्यांवर दिसत होता, जणूकाही अयोध्यानगरी रस्त्यावर आली आहे.
आजचा भारत ‘जुना’ आणि ‘नवा’ या दोन्ही गोष्टी आत्मसात करून पुढे जात आहे !
पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले की, येथे श्रीरामाचे भव्य मंदिर उभारल्यानंतर येथे येणार्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. हे लक्षात घेऊन आमचे सरकार अयोध्येत सहस्रो कोटी रुपयांची विकासकामे करून अयोध्येला ‘स्मार्ट’ बनवत आहे. जगात कोणताही देश असो, त्याला विकासाची नवी उंची गाठायची असेल, तर त्याचा वारसा जपलाच पाहिजे. आपला वारसा आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. त्यामुळे आजचा भारत जुना आणि नवा या दोन्ही गोष्टी आत्मसात करून पुढे जात आहे.
अयोध्या संपूर्ण उत्तरप्रदेशच्या विकासाला दिशा देणार !
पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘आगामी काळात अयोध्या शहर केवळ अवध क्षेत्राच्याच नव्हे, तर संपूर्ण उत्तरप्रदेशच्या विकासाला दिशा देणार आहे. ‘वन्दे भारत’ आणि ‘नमो भारत’ नंतर देशाला आणखी एक आधुनिक रेल्वे गाडी मिळाली आहे. नव्या गाडीला ‘अमृत भारत’ असे नाव देण्यात आले आहे.’’