Russia Biggest Attack Ukraine : रशियाकडून युक्रेनवर सर्वांत मोठे आक्रमण !

३१ लोकांचा मृत्यू, तर १२० जण घायाळ !

मॉस्को (रशिया) – रशियाने २९ डिसेंबरला युक्रेनवर पुन्हा एकदा जोरदार आक्रमण केले. रशियाकडून युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, तसेच ड्रोनद्वारे अनेक शहरांवर आक्रमणे करण्यात आली. युक्रेनच्या यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, युद्ध चालू झाल्यापासून रशियाकडून करण्यात आलेले हे सर्वांत मोठे आक्रमण आहे. या आक्रमणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इतर साहाय्य करण्याची घोषणा केल्यानंतर रशियाकडून हे आक्रमण करण्यात आले.

१. या आक्रमणाविषयी जो बायडेन म्हणाले, ‘‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर भीषण आक्रमण केल्यामुळे ‘त्यांना युक्रेनला उद्ध्वस्त करायचे आहे’, असे दिसते. त्यामुळे पुतिन यांना आता रोखण्याची आवश्यकता आहे. रशियाकडून डागण्यात आलेली अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन युक्रेनने हवेतच नष्ट केले. अमेरिका आणि सहयोगी देशांनी युक्रेनला पुरवलेल्या हवाई सुरक्षा प्रणालीचा युक्रेनने योग्य वापर केला.’’

२. या आक्रमणाविषयी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की म्हणाले की, रशियाने या वर्षातील सर्वांत मोठे आक्रमण केले आहे. त्याने युक्रेनवर जवळपास ११० क्षेपणास्त्रे डागली आहेत. या आक्रमणांत ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२० लोक घायाळ झाले आहेत.