New Year Celebration : पाश्चिमात्य संस्कृतीनुसार नवीन वर्ष साजरे न करण्याविषयी राज्यस्तरीय प्रबोधन स्पर्धेचे आयोजन
कोकण कला आणि शिक्षण विकास संस्थेचे युवा पिढीला सहभागी होण्याचे आवाहन
सावंतवाडी : नवीन वर्ष आणि नवी पिढी हे एक वेगळे समीकरण बनत चालले आहे. युवा पिढी पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत नवीन वर्षाचे स्वागत ‘झिंगत’ करतांना दिसते; पण या उलट भारतियांनी नवीन वर्ष कुणाला तरी साहाय्य करून साजरे करावे. ३१ डिसेंबरला वायफळ खर्च करत असलेले पैसे वाचवून गरजू लोकांना साहाय्य करावे आणि या माध्यमातून सामाजिक दातृत्व सिद्ध व्हावे, यासाठी सामाजिक पालट होणे आवश्यक आहे. हा पालट होण्यासाठी वैचारिक प्रबोधन करण्याच्या दृष्टीने कोकण कला आणि शिक्षण विकास संस्थेच्या वतीने ‘महायुवा सोशल रीलस्टार’ या राजस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था सामाजिक पालट घडवण्यासाठी गेली १२ वर्षे कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, स्वयंम् रोजगार आणि बालविकास केंद्र चालू करणे यांसह विविध उपक्रम राबवत असते.
नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रचलित पद्धतीत पालट होण्यासाठी ‘महायुवा सोशल रीलस्टार’ ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे. यातील सर्वांत चांगले ‘सोशल रील’ (व्हिडिओ) बनवणार्या पहिल्या ३ क्रमांकांना अनुक्रमे ११ सहस्र १११, ५ सहस्र ५५५, ३ सहस्र ३३३ रुपये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून १ सहस्र १११ रुपये आणि ‘ट्रॉफी’ देण्यात येणार आहे. यात युवा पिढीने अधिकाधिक सहभागी होऊन ‘नवीन वर्ष साजरे करण्याविषयी समाजात पालट घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. अधिक माहिती इन्स्टाग्रामवरील kokan_ngo वर उपलब्ध आहे, असे आवाहन कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी केले आहे.