Boycott Sunburn : न्यायालयाने दणका दिल्यावर सनबर्नकडून सरकारकडे रक्कम जमा !
‘सनबर्न’कडून हणजूण कोमुनिदाद आणि सरकार यांचे ३ कोटी २८ लाख रुपये जमा !
पणजी : ‘सनबर्न’च्या आयोजकांनी ३ कोटी २८ लाख रुपयांचे ‘डिमांड ड्राफ्ट’ व्यवसाय शुल्क, सुरक्षा ठेवी आणि अन्य शुल्क म्हणून हणजूण कोमुनिदाद अन् राज्य सरकार यांच्याकडे जमा केले आहेत, अशी माहिती सनबर्न आयोजकांच्या अधिवक्त्यांनी दिली. सनबर्नने कोमुनिदादला देय असलेले व्यवसाय शुल्क म्हणून २ कोटी ४३ लाख रुपये दिले आहेत. कोमुनिदाद प्रशासनाला ४८ लाख ६२ सहस्र रुपये आणि नागरी प्रशासकाच्या संचालकांना २४ लाख रुपये दिले असून १५ टक्के सुरक्षा ठेव म्हणून १२ लाख रुपये जमा केले आहेत.
(सौजन्य : Goa Today 24×7 News)
सर्वोच्च न्यायालयाद्वारे प्रलंबित कार्यवाही निश्चित होईपर्यंत कोमुनिदाद प्रशासनाकडून ही रक्कम राष्ट्रीयकृत अधिकोषात गुंतवली जाणार आहे. सनबर्नच्या आयोजकांनी कोमुनिदादला कोणतीही रक्कम न देता जागा कह्यात घेऊन संगीत कार्यक्रम चालू केल्याविषयी हणजूण येथील एका स्थानिकाने तक्रार केली होती. कोमुनिदाद प्रशासनाशी संपर्क न झाल्याने भाडे देण्यास विलंब झाल्याचा दावा सनबर्नच्या अधिवक्त्यांनी केला आहे.
८२ लाख रुपयांचे पास चोरल्याप्रकरणी सनबर्नच्या ५ कर्मचार्यांना अटक
पणजी : सनबर्न कार्यक्रमाचे ८२ लाख रुपयांचे ‘पास’ आणि ‘बँड’ (कार्यक्रमात प्रवेश करतांना ओळखीसाठी हातात घालायची खूण) चोरल्याप्रकरणी सनबर्नच्याच ५ कर्मचार्यांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५० लाख रुपयांची तिकिटे कह्यात घेण्यात आली. शिवम् च्यारी, महेश गवस, मनजीत गवस, यशीन मुल्ला आणि सिद्धनगौडा हंचिनल, अशी आरोपींची नावे आहेत.