संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खाची लक्षणे
प्रत्येकाला स्वतः मूर्ख असल्याची जाणीव नसल्याने त्याने स्वतः सोडून इतरांना मूर्ख समजणे !
एका माणसाने ‘मूर्खांशी बोलायचे नाही’, असे ठरवले. एकदा त्याची गाठ विनोदी लेखक आणि नाटककार राम गणेश गडकरी यांच्याशी पडली. गडकरी त्याच्याशी बोलू लागले. तो माणूस म्हणाला, ‘‘मूर्खांशी मी बोलत नाही. तशी मी प्रतिज्ञा केली आहे.’’ गडकरी म्हणाले, ‘‘मी तशी प्रतिज्ञा केलेली नाही; म्हणून तर मी तुमच्याशी बोलतो आहे.’’
मौन हे मूर्खाचे भूषण असणे
स्वायत्तमेकान्तगुणं विधात्रा विनिर्मितं छदनमज्ञातायाः ।
विशेषतः सर्वार्विंदां समाजे विभूषणं मौनमपण्डितानाम् ॥
– नीतिशतक, श्लोक ७
अर्थ : ब्रह्मदेवाने स्वतःच्या नियंत्रणात राहील, असे अतिशय हितकारक असे (मौन हे) झाकण निर्माण केले आहे. सर्वज्ञांच्या समाजात मूर्खाचे मौन हेच त्याचे भूषण आहे. मूर्खाने तोंड उघडले, तर त्याची फजिती होते.
शहाण्यांचा द्वेष करणे हा तर मूर्खाचा स्वभाव !
मूर्खाेऽपि मूर्खं दृष्ट्वा च चन्दनादपि शीतलः ।
यदि पश्यति विद्वांसं मन्यते पितृघातकम् ॥
अर्थ : मूर्खाने मूर्खाला पाहिले, तर तो चंदनापेक्षा थंड होतो; पण त्याने विद्वानाला पाहिले, तर ‘हा आपल्या बापाचा खुनी आहे’, असे मानून त्याच्याकडे पहातो. शहाण्यांचा द्वेष करणे, हा तर मूर्खाचा स्वभाव आहे.