प्रमोद भानगिरे यांनी आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतर कोंढवा (पुणे) येथील दफनभूमीचा प्रस्ताव रहित !
पुणे – कोंढवा येथील साधारणतः १० ते १५ सहस्र हिंदु लोकवस्ती असलेल्या सर्वे क्रमांक ४४ या भागात, लहान मुलांच्या खेळासाठी असलेल्या फूटबॉलच्या मैदानासाठी महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी ४५ लाख रुपयांचा निधी संमत करून दिला होता. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेकडे संबंधित ठिकाणी मुसलमान समाजाची दफनभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता; मात्र कायद्यानुसार भर लोकवस्तीच्या ठिकाणी कोणतीही दफनभूमी किंवा स्मशानभूमी करता येऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी संबंधित जागेवरील दफनभूमी रहित करण्याविषयी महानगरपालिकेकडे निवेदन देत ‘दफनभूमी प्रस्ताव रहित केला नाही, तर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करू’, अशी चेतावणी दिली होती. त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने संबंधित ठिकाणी होऊ पहाणार्या दफनभूमीचा निर्णय मागे घेतला आहे, अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? महापालिका प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक)
कोंढवा हा भाग सर्वाधिक मुसलमान लोकसंख्येचा परिसर म्हणून परिचित आहे; मात्र कोंढव्यात ज्या ठिकाणी हिंदु नागरिकांची दाट लोकवस्ती आहे, त्या भर लोकवस्तीत मुसलमान समाजाची दफनभूमी बांधण्यात येणार असल्याचा प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे स्मशानभूमी किंवा दफनभूमी ही लोकवस्तीच्या बाहेर असावी, हे सर्वज्ञात असतांनाही या ठिकाणी दफनभूमी करण्यासाठी स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे त्याविषयीची विनंती केली होती. त्यासंदर्भात मथळा लिहून त्यांनी आयुक्तांसमोर पत्रही सादर केले होते.