विठुमाऊलीच्या प्रसादात घोटाळा करणार्यांना मंदिर समितीने घातले पाठीशी !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वर्ष २०२१-२२ च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालामध्ये भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात आलेले लाडू दर्जाहीन असल्याचे उघड झाले. लेखापरीक्षणात नोंदवण्यात आलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याविषयी कोणते प्रयत्न केले, याविषयीच्या अनुपालन अहवालात मंदिर देवस्थान समितीने स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये ज्या बचतगटाला लाडू बनवण्याचा ठेका दिला होता, त्यांच्याकडून तो काढून घेण्यात आल्याचे आणि ‘डिपॉझिट’ (ठेव रक्कम) जप्तीची कारवाई केल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र मंदिर समितीने हे प्रकरण कशा प्रकारे गुंडाळले, हे या लेखाद्वारे उघड करत आहोत.(भाग २)
७. असा झाला लाडू घोटाळा !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडून भाविकांना प्रसादासाठी देण्यात येणारे लाडू बनवण्याचा ठेका महिला बचतगटांना देण्यात आला होता. ठेका देतांना लाडूमध्ये शेंगदाण्याचे तेल वापरण्याविषयीचा करार करण्यात आला. महिला बचत गटाकडून ज्या प्लास्टिकच्या वेष्टनातून प्रसाद म्हणून लाडू देण्यात येत होते, त्यावर शेंगदाण्याच्या तेलाचा उपयोग केला जात असल्याचे नमूदही करण्यात आले होते. प्रत्यक्षात लेखापरीक्षकांनी जेव्हा लाडू बनवण्याच्या कारखान्याला भेट दिली, तेव्हा शेंगदाण्याच्या तेलाऐवजी लाडवांमध्ये कापसाच्या बियांचे अल्प दर्जाचे तेल वापरण्यात येत असल्याचे आढळून आले. करारानुसार ‘लाडवांमध्ये सुकामेवा (ड्रायफूट्स) वापरण्यात यावे’, असेही निश्चित करण्यात आले होते. प्रत्येक लाडवामध्ये सुकामेव्याचे प्रमाण किती असावे, हे करारामध्ये ठरवून घेण्यात आले नाही. प्रसादाच्या वेष्टनावर लाडवांमध्ये सुकामेव्याचा उपयोग केला जात असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र सुकामेवा किंवा अन्य पौष्टिक पदार्थांचा उपयोग लाडवांमध्ये करण्यात येत नसल्याचे लेखापरीक्षकांना आढळून आले.
८. सरळसरळ भ्रष्टाचार होत असतांनाही मंदिर समितीने घातले पाठीशी !
प्रसादाच्या लाडवांमध्ये शेंगदाण्याचे तेल असल्याचे आणि सुकामेव्यासह अन्य पौष्टिक पदार्थ असल्याची खोटी माहिती देऊन बचतगटाने भाविकांना अल्प दर्जाचे लाडू देऊन भ्रष्ट मार्गाने पैसे कमवले. लेखापरीक्षणात हा प्रकार उघड झाला; मात्र ‘करारानुसार लाडू बनवले जात आहेत ना ?’, याची पडताळणी करण्याचे काम खरे तर मंदिर समितीचे होते; मात्र त्यांनी त्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केले.
९. कसली कारवाई आणि कसले काय ? केवळ दिशाभूल !
या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी झाली असती, तर सर्व उघड झाले असते; परंतु ही चौकशी होणार नाही, याची दक्षता मंदिर समितीने घेतली, हे तर उघड सत्य आहे. प्रसाद म्हणून देण्यात येत असलेले लाडू अल्प दर्जाचे होते, हे मंदिर समितीने मान्य केले; परंतु त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात आली नाही. लाडू बनवणार्या बचत गटाची ठेव रक्कम मंदिर समितीने जप्त केली आणि बचत गटाचे काम काढून घेऊन मंदिर समितीने स्वत:कडे लाडू बनवण्याचे काम घेतल्याची कारवाई केल्याचे स्पष्टीकरण दिले. यामध्ये बचत गटांची जप्त केलेली ठेव रक्कम नेमकी किती ? हे मात्र मंदिर समितीने सोयीस्करपणे सांगण्याचे टाळले. ‘लाडू बनवण्याचे काम स्वत:कडे घेतले’, असे मंदिर समिती सांगत असली, तरी या बचत गटाच्या कामाचा ठेकाच मुळात ऑक्टोबर २०२३ मध्ये संपला. त्यामुळे कुठली कारवाई आणि कुठले काय ? श्रद्धेचा बाजार मांडून भाविकांची फसवणूक करून पैसे कमवणार्यांवर तक्रार प्रविष्ट करून गुन्हा नोंदवायला हवा होता, तसे न करता त्यांना पाठीशी घालणे, हेच मुळात संशयास्पद आहे. यातून या भ्रष्टाचारामध्ये मंदिर समितीमधील पदाधिकार्यांचाही वाटा होता का ? या संशयाला वाव आहे.
१०. लाडू बनवण्याच्या ठिकाणी अस्वच्छता !
बचत गटांकडून बनवलेले लाडू ज्या ताडपत्र्यांवर वाळवण्यात येत होते, ते अतिशय काळेकुट्ट आणि तेलकट असल्याचेही लेखापरीक्षकांनी अहवालात नमूद केले आहे. लाडू बनवण्यात येत असलेल्या कारखान्याच्या दरवाजाचा काही भाग तुटला होता. त्यामधून पाली, उंदीर, सरपटणारे प्राणी आतमध्ये प्रवेश करू शकले असते. ज्या ठिकाणी श्री विठ्ठलाचा प्रसाद सिद्ध केला जातो, तेथे किमान स्वच्छता तरी ठेवणे अपेक्षित होते; मात्र तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे लेखापरीक्षकांनी सांगितले. हे प्रकार काही दिवसांचा प्रसादाचे लाडू बनवण्याचा ठेका घेतल्यापासून चालू होते; परंतु त्याकडे मंदिर समितीने अक्षम्य दुर्लक्ष केले यापेक्षा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, हीच शक्यता अधिक आहे.
‘ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी मैलोन्मैल पायी चालत येतात, त्या मंदिरातील सरकारी विश्वस्तांना याची चाड किती आहे ?’, असा प्रश्न मंदिर समितीच्या अशा गलथान कारभारामुळे निश्चितच पडतो. ‘वारकर्यांविषयीची आत्मीयता एक वेळ राहू द्या; पण आराध्य दैवत श्री विठ्ठलाविषयी श्रद्धा असलेले सरकारी विश्वस्त असे कसे वागू शकतात ?’, हाच प्रश्न पडतो. मंदिरांचे सरकारीकरण नको, तर देवतेविषयी भक्तीभाव असलेल्या भक्तांकडे मंदिरांचे व्यवस्थापन द्यावे, ते याचसाठी !
(क्रमशः सोमवारच्या अंकात)
– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई (२८.१२.२०२३)