पाकिस्तानी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबण्यासाठी भारताने करावयाचे प्रयत्न
१. पाकिस्तानचे अस्तित्व भारतद्वेषावर अवलंबून असल्याने आतंकवादी आक्रमणे थांबणे अशक्य !
‘भारताने काश्मीरमधील आतंकवाद्यांचे कंबरडे मोडण्यात यश मिळवले असले, तरी पाकिस्तान हा असा देश आहे, जो आतंकवाद पुनर्जिवीत करण्याचा प्रयत्न कधीच सोडणार नाही; कारण पाकिस्तानचे पूर्ण अस्तित्वच भारतद्वेषावर अवलंबून आहे. काश्मीर खोर्यातील आतंकवादाचे प्रमाण थोडे न्यून झाले असले, तरी असे मानले जाते की, आजही काश्मीर खोर्यात अनुमाने १०० आतंकवादी असावेत. याखेरीज काश्मीरच्या पुंछ, राजोरी आणि अखनूरच्या भागात १० ते १५ आतंकवादी असावेत आणि संपूर्ण काश्मीरमध्ये ११५ ते १५० आतंकवादी असावेत. पुंछ आणि राजोरी येथील आतंकवादी कडवे आहेत. काही वेळेला त्यांच्याकडून भारतीय सैन्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण झाले आहे. असे समजले जाते की, पाकिस्तान सैन्याच्या विशेष दलाच्या सैनिकांना कंत्राटी पद्धतीने या भागात आतंकवादी आक्रमण करण्यासाठी पाठवले जाते. त्यांचे प्रशिक्षणही चांगले असते, तसेच त्यांची शस्त्रेही अत्याधुनिक असतात. त्यांना पाकिस्तानी सैन्याकडून विविध साहाय्य मिळते. त्यांची जिहादसाठी मरायची सिद्धता असते. त्यामुळे अशी आक्रमणे होतात आणि होत रहातील.
२. सीमेअंतर्गत आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवण्यात भारताला यश !
आपल्या एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की, हे पाकिस्तानच्या विरोधात चाललेले युद्ध आहे. यात विजय-पराजयाचे मूल्यमापन हे भारताचे किती सैनिक हुतात्मा झाले आणि किती आतंकवादी मारले गेले, यांवरून करता येत नाही. या भागात भारताचे सैनिक ३४ हून अधिक हुतात्मा झाले, तरी त्याच काळात या भागात अनुमाने ६५ आतंकवादीही मारले गेले आहेत, हे विसरता येत नाही. त्यामुळे माध्यमांनी यालाही महत्त्व देणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर भारताच्या सीमेअंतर्गत आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवण्यात भारताला बर्यापैकी यश मिळाले आहे. जोपर्यंत पाकिस्तानसारखा देश अस्तित्वात आहे आणि त्याला चीनचे समर्थन आहे, तोपर्यंत अशा प्रकारच्या कारवाया होतच रहातील. भारत आतंकवाद्यांना मारत असला, तरी ती समोरासमोरची लढाई असते.
३. प्रसारमाध्यमांनी सैन्य चकमकीचे नकारात्मक प्रसारण करणे टाळावे !
२१ डिसेंबर २०२३ या दिवशी आतंकवाद्यांनी सैनिकांच्या गाडीवर आक्रमण झाले. त्यात ५ सैनिक हुतात्मा झाले, तर ३ सैनिक घायाळ झाले. त्यांच्या विरोधात कारवाई करणारे आतंकवादी ३ ते ४ होते. ही चकमकीच्या स्वरूपातील लढाई असते. त्यामुळे त्यात कोण मारले जाईल, हे सांगता येत नाही. अशा प्रसंगी पहिले आक्रमण करणार्यांना नेहमीच अधिक यश मिळते; कारण त्यांनी लपून आक्रमण केलेले असते. ज्या मार्गावरून गाड्यांची वाहतूक होते, त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगले आहेत. अशा रस्त्यांवर २४ घंटे देखरेख ठेवणे कधीही शक्य नसते. तेथे लपून बसलेले आतंकवादी अचानक आक्रमण करतात. त्यात आपल्या सैनिक घायाळ होत असले, तरी आक्रमण करणारे आतंकवादी कधीही जिवंत परत जात नाहीत. याची खात्री भारतीय सैन्य तुम्हाला नेहमीच देत असते. त्यामुळे माध्यमांनी बातम्यांचे नकारात्मक प्रसारण करणे टाळावे. एक सांगण्यात आले की, २ भारतीय अधिकारी मागच्या चकमकीत मृत्यूमुखी पडले होते; कारण यात क्रिकेटच्या सामन्याप्रमाणे जय-पराजय होणारी चमू ही आधीच ठरलेली नसते. ही खरोखरची लढाई आहे, यात शेवटी विजय भारताचा होईलच; परंतु काही काही वेळा या विजयाची किंमत भारताला रक्त सांडून द्यावी लागते.
४. जनतेने भारतीय सैन्याच्या मागे संघटितपणे उभे रहाणे आवश्यक !
वर्ष २०२३ संपायला आले आहे आणि पाकिस्तानच्या साहाय्याने आतंकवादी कारवाया केवळ काश्मीर खोर्यापुरत्या सिमित राहिल्या नसून त्या काश्मीरच्या खालच्या भागातही होत आहेत. त्यांना काश्मीरचे सूत्र परत एकदा जगासमोर आणायचे आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कारवाया चालूच रहाणार आहेत. भारताला पाकिस्तानी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवावी लागेल. ज्या आतंकवाद्यांना सीमेच्या आत येण्यात यश मिळते, त्यांना नंतर मारावेच लागेल, तरच भारत ही लढाई जिंकू शकेल. ही लढाई भारताने बर्यापैकी जिंकलेली आहे; पण जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे आणि त्यांना चीनचे साहाय्य आहे, तोपर्यंत ही लढाई अजून अनेक वर्षे चालणार आहे. या लढाईची किंमत आपल्या भारतीय सैन्याला रक्त सांडून द्यावी लागते. त्यामुळे देशवासियांना विनंती आहे की, त्यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्या विरोधात लढणार्या भारतीय सैन्याच्या पाठीमागे संघटितपणे उभे रहावे. त्यामुळे हे युद्ध पुढच्या काही मासांमध्ये किंवा वर्षांमध्ये आपल्याला जिंकता येईल.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.