Canada Firing : कॅनडामधील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या अध्यक्षांच्या घरांवर झाडण्यात आल्या १४ गोळ्या !
|
ओटावा (कॅनडा) – आतापर्यंत कॅनडात खलिस्तान्यांकडून हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करून त्यांनी तोडफोड केली जात होती. यासह भारत, हिंदू आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात येत होत्या; मात्र आता सरे प्रांतातील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर २८ डिसेंबरच्या रात्री आक्रमण करण्यात आले आहे. त्यांच्या घरावर १४ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या मासात श्री लक्ष्मीनारायण मंदिराने खलिस्तान्यांचा निषेध केला होता. यातूनच हा गोळीबार झाल्याचे म्हटले जात आहे; मात्र हा गोळीबार कुणी केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या आक्रमणाचे अन्वेषण करत आहेत.
१. सतीश कुमार यांनी या घटनेविषयी सांगितले की, ज्या घरावर आक्रमण झाले, तेथे माझा मुलगा रहतो. पोलीस सध्या गोळीबार करणार्यांचा शोध घेत आहेत. हा गोळीबार नेमका कुणी केला? हे आताच सांगणे कठीण आहे. काही दिवसांपूर्वी मंदिरांवर आक्रमणे झाली होती. त्याचा आणि या आक्रमणाचा काही संबंध आहे का ? असा प्रश्न विचारला असता सतीश कुमार यांनी सांगितले की, याविषयी आताच सांगता येणार नाही.
२. श्री लक्ष्मीनारायण मंदिर किंवा मंदिराशी संबंधित सदस्य यांना लक्ष्य करण्याची ही तिसरी वेळ आहे. या घटनांनंतर कॅनडातील भारतीय हिंदु समुदायाने तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
संपादकीय भूमिकाकॅनडातील एकूणच परिस्थिती पहाता यामागे खलिस्तान्यांचा हात असेल, यात शंका नाही. जर हे खरे निघाले, तर भारताने हा विषय जगापुढे अधिक प्रखर मांडून खलिस्तान्यांवर कारवाई करण्यासाठी कॅनडाला भाग पाडले पाहिजे ! |