अयोध्या, काशी आणि मथुरा यांसह सर्वच तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घाला !
हिंदु जनजागृती समितीची उत्तरप्रदेश सरकारकडे मागणी
मुंबई – येत्या २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत होणार्या श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मद्य आणि मांस यांवर १०० टक्के बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती. यासाठी अनेक ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनेही केली. याची तत्परतेने नोंद घेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येच्या ८४ कोसी परिक्रमा यात्रेच्या क्षेत्रात मद्यबंदी आणण्याचा निर्णय घेतला. या स्तुत्य निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते आणि उत्तरप्रदेश सरकारचे आभारही व्यक्त करते. याचप्रमाणे सर्व धार्मिक क्षेत्रांचे पावित्र्य जपण्यासाठी संपूर्ण अयोध्येसह काशी, मथुरा आणि अन्य सर्व तीर्थक्षेत्रांच्या परिसरात मद्य आणि मांस यांवर १०० टक्के बंदी आणण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.
समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की
१. आज देशातील अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे आदी ठिकाणी लाखो भाविक भेटी देतात. याठिकाणी ‘पर्यटनवृद्धी’च्या नावाखाली बिअरबार, डान्सबार, मद्याची दुकाने, चायनीज खाद्यपदार्थांची दुकाने, मसाज सेंटर, मटणाची दुकाने मोठ्या प्रमाणावर उघडली जातात.
२. प्रत्यक्षात येणारे भाविक हे देवदर्शन, तीर्थयात्रा, साधना करण्यासाठी अशा ठिकाणी येत असतात. मद्य आणि मांस ग्रहण करणे किंवा चंगळ करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे भाविकांसाठी सोयी-सुविधा अवश्य निर्माण कराव्यात; मात्र अशा पवित्र स्थानांचे पावित्र्यही जपायला हवे.
३. काही तीर्थक्षेत्री गेल्यावर तेथील पावित्र्य जपले न गेल्याने ‘खरेच आपण तीर्थक्षेत्री आलो आहोत का ?’, अशी शंका निर्माण होते; म्हणून यापूर्वी हरिद्वार आणि ऋषीकेश येथेही स्थानिक प्रशासानाने मद्य आणि मांस यांवर १०० टक्के बंदी आणली.
४. ‘हरिद्वार आणि ऋषीकेश या तीर्थक्षेत्री कुंभमेळे होतात. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक तेथे धार्मिक उपासना करण्यासाठी येतात. या कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावना तीर्थक्षेत्राशी जोडलेल्या आहेत. त्याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे’, असे म्हणत ही बंदी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. याच धर्तीवर सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य आणि मांस यांवर १०० टक्के बंदी आणावी.