‘टेस्ला’ आस्थापन इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची शक्यता !
|
कर्णावती (गुजरात) – जगात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात सर्वांत पुढे असणारे अमेरिकी आस्थापन ‘टेस्ला’ भारतातील गुजरातमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जानेवारी २०२४ मध्ये गुजरात सरकारकडून आयोजित ‘व्हायब्रंट गुजरात समिट’ या परिषदेत यावर अंतिम निर्णय होणार आहे. या परिषदेला टेस्लाचे मालक इलॉन मस्कही उपस्थित रहाणार आहेत, असे सांगितले जात आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार टेस्लाचे अधिकारी आणि गुजरात सरकार यांच्यातील चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे.
सौजन्य इंडिया टूडे
१. हा प्रकल्प आपल्याकडे उभारला जावा, यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्येही प्रयत्नशील होते.
२. गुजरात राज्यातील सानंद जिल्ह्यात हा प्रकल्प उभारला जाईल. त्यासाठी जागा देण्याची निश्चितीही राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. येथून गाड्यांची निर्यात सहज होऊ शकत असल्याने टेस्लाने गुजरात राज्याची निवड केल्याचे सांगितले जात आहे. सानंद जिल्ह्यापासून कांडला-मुंद्रा बंदरापर्यंत वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
३. वर्ष २०२२ मध्येही हा प्रकल्प भारतात येणार असल्याचे सांगितले जात होते; परंतु आस्थापनाची आयात शुल्क कपात करण्याची मागणी केंद्र सरकारने पूर्ण न केल्यामुळे टेस्लाने भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय रहित केला होता. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला असता इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी त्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे संकेत दिले होते.