उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये पाठवणार बांधकाम करणारे कामगार !
|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये बांधकाम करणारे कामगार पाठवणार आहे. सध्या इस्रायलला अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने उत्तरप्रदेश सरकारने ही संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रायलमध्ये बांधकाम कामगारांना महिन्याला सवा लाख रुपये वेतन मिळेल, तसेच प्रत्येक महिन्याला १५ सहस्र रुपयांचा अतिरिक्त बोनसही देण्यात येईल. ही रक्कम ज्या आस्थापनाच्या माध्यमांतून हे कामगार काम करणार आहेत, त्या आस्थापनाच्या खात्यात जमा करण्यात येईल आणि जेव्हा कामगारांचा कामाचा कार्यकाळ संपेल, तेव्हा त्याला सर्व रक्कम हस्तांतरीत केली जाईल, असे सांगितले जात आहे.
१. या संदर्भात उत्तरप्रदेश सरकारच्या कामगार विभागाने विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. या अंतर्गत सरकार मिस्त्री, टाइल्स लावणारे कामगार, तसेच बांधकामाशी निगडित इतर कामगार यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेअंतर्गत इस्रायलमध्ये सुरक्षित अशा बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे.
२. इस्रायल आणि हमास यांच्यात ७ ऑक्टोबरपासून युद्ध चालू झाल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी कामगारांना त्याच्या देशात काम करण्यावर बंदी घातली. त्यामुळे इस्रायलला पर्यायी कामगारांची आवश्यकता आहे. गेल्या मासातच इस्रायलने या संदर्भात भारताकडे कामगारांची मागणी केल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. आखाती देशांत भारताचे लाखो कामगार विविध क्षेत्रांत काम करत असल्याने इस्रालयमध्येही ते आता जाण्याची शक्यता आहे.
३. यावर्षी मे मासामध्ये ४२ सहस्र कामगार इस्रायलला पाठवण्यासाठी भारत आणि इस्रायलने करार केला होता. यांपैकी ३४ सहस्र कामगार हे बांधकामाशी संबंधित होते. हमासविरुद्ध युद्ध चालू झाल्यानंतर इस्रायलमधील बांधकाम क्षेत्र जवळपास ठप्प झाले आहे.
हरियाणानेही प्रसिद्ध केले होते विज्ञापन !
हरियाणा सरकारनेही १५ डिसेंबर या दिवशी अशाच प्रकारचे विज्ञापन प्रसिद्ध करून इस्रायलमध्ये १० सहस्र कामगारांची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. याला विरोधी पक्षांनी विरोधही केला होता. ‘बांधकाम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या कामगारांना इस्रायलमध्ये दीड लाख वेतन मिळेल, तसेच ६३ मासांहून अधिकचा करार नसेल’, असे या विज्ञापनामध्ये नमूद करण्यात आले होते.
अटी आणि शर्ती यांची करावी लागणार पूर्तता !
इस्रायलमध्ये बांधकामासाठी जाणार्या कामगारांना काही अटी-शर्ती यांची पूर्तता करावी लागणार आहे. यात किमान १ वर्ष ते कमाल ५ वर्षांचा करार करावा लागणार आहे. ज्या कामगारांना इस्रायलमध्ये काम करायचे आहे, त्यांच्या नातेवाइकांपैकी कुणीही इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. अर्जदार २१ ते ४५ वर्षे या वयोगटांतील असावा. त्याला बांधकाम क्षेत्रात किमान ३ वर्ष काम केल्याचा अनुभव असावा. यासह भारत ते इस्रायल आणि तिथून परतण्याचा खर्च कामगाराला स्वतः करावा लागणार आहे, अशा काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.