संपादकीय : धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन व्हावे !

भारत हा प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांनी नटलेला देश आहे. कालौघात आपल्याला मात्र आपल्याच अनेक प्राचीन गोष्टींचे विस्मरण झाले आहे. या गोष्टी नव्या पिढीला समजाव्यात, यासाठी गुजरात सरकारने नुकताच एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गुजरात सरकार द्वारकेपासून काही किलोमीटर अंतरावर समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीचे अवशेष पहाण्यासाठी पाणबुडीची सुविधा उपलब्ध करणार आहे. हा धार्मिक पर्यटनाचा जरी भाग असला, तरी याद्वारे समृद्ध अशा द्वारकेच्या अवशेषांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. श्रीकृष्ण ही धर्मसंस्थापनेची देवता आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे हिंदु समाज आनंदी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची ही देणगी म्हणता येईल. तथापि भाविकांनी केवळ द्वारकानगरीच्या बाह्य दर्शनावर समाधान न मानता तेथे सहस्रो वर्षांपासून ओतप्रोत भरलेल्या कृष्णतत्त्वाची अनुभूतीही घेतली पाहिजे, तरच ‘त्यांच्या या प्रवासाचे सार्थक झाले’, असे म्हणता येईल. त्या दृष्टीनेही सरकारने व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी एखादा मार्गदर्शक (गाईड) ठेवण्यासारख्या उपाययोजना करता येतील. भाविकांना हे कृष्णतत्त्व अनुभवायाचे असेल, तर त्यांनी स्वतः साधना करणेही आवश्यक आहे. एकूणच दोन ते अडीच घंटे खोल समुद्रात प्रवास करून द्वारकानगरीचे दर्शन घेणे खरोखरच अद्भुत असेल. सरकारची इच्छाशक्ती असेल, तर सरकार काहीही करू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. भाविकांमध्ये जशी द्वारकेविषयीची ओढ आहे, तशीच रामसेतूविषयीसुद्धा आहे; परंतु यातील बराचसा भाग श्रीलंकेत असल्याने प्रत्यक्ष रामसेतूचे दर्शन घेता येणे शक्य होत नाही. काँग्रेसने ऐतिहासिक रामसेतूचे अस्तित्वच नाकारले होते. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा करणेच चूक होते; परंतु आता गुजरात सरकारच्या द्वारकादर्शन व्यवस्थेच्या धर्तीवर केंद्र सरकारने रामसेतूचेही प्रत्यक्ष दर्शन घेता येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. असे झाल्यास श्रीराममंदिर बांधल्यामुळे आधीच आनंदी झालेल्या श्रीरामभक्तांचा आनंद द्विगुणित होईल. श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभमुहूर्त साधून सरकारने याची घोषणा करायला हवी; कारण धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन होणे, ही काळाची आवश्यकता आहे !