भारतीय शिक्षणप्रणाली : वास्तव आणि आदर्श !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे राष्ट्र-धर्माविषयीचे मौलिक विचारधन !
१. शिक्षणाचे पाश्चात्त्यीकरण झाल्याने भारतीय तरुण उच्छृंखल होणे
‘पश्चिमी प्रणालीचे शिक्षण भारतात चालू झाले आणि युवा पिढी जडवादी अन् भोगवादी झाली. आजच्या शिक्षणात ‘राम’ अभावानेही उरला नाही; म्हणून आजचा भारतीय तरुण पश्चिमेसारखा उच्छृंखल, भोगवादी, लैंगिक आणि विध्वंसक झाला आहे.
आजचे शिक्षण उदारमतवादी आहे. ‘विद्यार्थी उदारमतवादी होत आहेत’, असे सांगतात. ते शिक्षण बुद्धीवादी आहे. व्यावसायिकीकरण झाले आहे. आजचा विद्यार्थी मेकॅनिक वा तंत्रज्ञ होतो. यंत्रवत् होतो. कशाकरता शिक्षण द्यायचे ? तो माणूस आहे; म्हणून त्याला शिकवायचे कि ‘माणूस’ होण्याकरता शिकवायचे ?
२. उच्च कोटीचा महापुरुष घडवणारे शिक्षण हवे !
‘सा विद्या या विमुक्तये ।’, म्हणजे जी मुक्त करते ती विद्या ! विद्यार्थी तोच जो जन्मभर शिकत रहातो; पण ते शिक्षण आज नाही. मनाला प्रशिक्षण नाही. ‘संयम’ हेच तर शिक्षणाचे सार आहे. ‘नैतिक, आत्मिक आणि सांस्कृतिक उन्नती व्हावी’, असे आजच्या शिक्षणात काय आहे ? रामायणातील त्या संयमाच्या, भौतिक वासनांचा तिरस्कार करून आत्मिक उन्नती साधणारे, निष्ठेच्या परंपरा आत्मसात् करणारे शिक्षण आज अभावानेही नाही. त्याविना उच्च कोटीचा महापुरुष कसा घडू शकेल ? संयम हेच तर सौंदर्य आणि शक्ती आहे.
३. संस्कृतीचा विकास नव्हे, विनाश !
राष्ट्राचे प्रचंड औद्योगिकीकरण आणि अतीप्रचंड उत्पादन म्हणजे का संस्कृतीचा विकास ? औद्योगिकरणाने मानव रसातळाला जात आहे. आत्म्याच्या उन्नतीविना संस्कृतीच्या विकासाचे मोजमाप कसे करता येईल ? ती प्रचंड लोकसंख्येची भोगलोलुप शहरे, तेथील ८०/८० मजली उंच हवेल्या (इमारती), राक्षसी यंत्रे यांची संस्कृतीच्या विकासाला रतीमात्र आवश्यकता नाही. शांत स्वस्थ आणि निरामय जीवनाचा विनाश करणारी ही राक्षसी प्रणाली आहे.
४. राष्ट्राच्या अधःपतनाची कारणे
आर्थिक विकास या एकमेव उद्दिष्टाला अनुकूल अशी आजची भारतीय शिक्षणव्यवस्था नेमकी राष्ट्राचा अंत घडवून आणील. आजचे शिक्षण इंद्रियभोग आणि शरीरभोग यांचे आहे. येथे उद्दाम वासनांचा थयथयाट आहे. पश्चिमेचे वळण गिरवणार्या भारतात कोट्यवधी पौंडाच्या योजना आज राबवल्या जात आहेत; पण गंमत अशी की, ज्यांच्यासाठी या योजना आहेत आणि जे योजनेत सहभागी आहेत, ती पिढी तर पंचतारांकित इष्काच्या (प्रेमाच्या) पेल्यात, कामिनीत आणि क्रिकेटमध्ये मग्न असेल, तर त्या सगळ्या योजना संवेदनाशून्य नाहीत का ? इथे ज्ञानाला (wisdom), मुक्तीला मूल्य शून्य आहे. त्यामुळे अनैतिकता, भ्रष्टाचार, भोगलालसा बोकाळणार आहे. तशी अवस्था आज आम्ही अनुभवत आहोत. हीच तर राष्ट्राच्या अधःपतनाची कारणे आहेत.
५. शिक्षणाचे उद्दिष्ट काय ?
ऐषोराम, भोगलोलुपता, लैंगिकता, मोडतोड करण्याची वृत्ती यांना आजच्या शिक्षणात प्रतिबंध केला जात नाही. यामुळे ते दुर्गुण हे सद्गुणाचे रूप घेऊन उजळमाथ्याने वावरतात. इंद्रियभोग, वासना विश्वाशी जखडून टाकतात. प्रकृतीच्या जोखडातून मुक्त करणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे.
६. रामचिंतनाविना शांती अशक्य !
ब्रट्रँड रसेल नेमके तेच सांगतो. तो लिहितो, “The man who can centre his thoughts and hopes upon something transcending himself can find peace.” याचा अर्थ स्पष्ट आहे. रामचिंतनाविना शांती अशक्य ! (रसेल याच्या विधानाचा शब्दशः अर्थ – जो मनुष्य स्वत:चे विचार केंद्रित करू शकतो आणि स्वतःच्या पलीकडे असलेल्या एखाद्या गोष्टीविषयी आशा ठेवू शकतो, त्याला शांती मिळू शकते.)
७. विद्यार्थ्यांसमोर उच्चतम मूल्ये असणे आवश्यक !
भौतिकता हाच एकमेव आधार असलेले शिक्षण हे अत्यंत गर्हणीय (निंदनीय) आहे. “It is the worst education” (हे सर्वांत वाईट शिक्षण आहे) असे स्टर्लींग सांगतो.
“Lazy will, fear of pain, greed for pleasure and harvest of other evils, invade the youthful mind.” (याचा अर्थ – इच्छाशक्ती नसणे, दुःखाची भीती, सुखाचा लोभ आणि इतर वाईट गोष्टी तरुण मनावर आक्रमण करतात.)
यातून मन मुक्त करण्याकरता विद्यार्थ्यांसमोर उच्चतम मूल्ये असली पाहिजेत. रामायणाचा तोच तर ‘well tested and age old’ (जुने; पण चांगले चाचपणी केलेले) संदेश आहे.
८. खरे शिक्षण कोणते ?
रामायणातील त्या प्रत्येक महापुरुषाचा उच्चतम मूल्याकरता सर्वस्वाचा त्याग ! ते अद्भुत चारित्र्य, तो संयम, ते ब्रह्मवर्चस्व ! ते वळण गिरवणारे शिक्षण आजच्या विद्यार्थ्याला दिल्याविना अधःपतन थांबणार नाही. नंतर चित्त संस्कारित होईल. शुद्ध (refined) होईल आणि मोक्षाच्या वळणाला जाईल. संयमाने चित्ताची अशुद्धी जळून जाते. Inner light shines more and more म्हणजे आतील प्रकाश अधिकाधिक पसरतो. तेच शिक्षण, जे मानवाला संयम शिकवते, जे पशूवृत्तीपासून वर उचलून देवत्वाच्या पातळीवर पोचवते, जे इंद्रिय, भोग आणि वासना यांच्या जोखडातून मुक्त करते अन् खर्या शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देते.
९. ज्ञान आत्मसात होण्याचे महत्त्व आणि टप्पे !
आजचे शिक्षण म्हणजे माहितीचे शिक्षण. भरगच्च माहिती मेंदूत कोंबणारे शिक्षण. ज्याच्याकडे माहिती अधिक तो विद्वान ! असे जर असेल, तर ग्रंथालये ही सर्वाधिक विद्वान ठरतील. आजच्या शिक्षणांत आत्मसात करणे नाही. रामकथा आत्मसात करता यायला हवी. ‘ग्रहण’ विकसित झाले पाहिजे, तरच अंतर्ज्ञान लाभेल. अंतःप्रज्ञा प्राप्त होईल, तरच विद्यार्थी शीलसंपन्न होईल. इंद्रिये, भोगवासना, आवड आणि वासना यांपासून दूर यायचे. याचा अर्थ विश्वाचे प्रभुत्व आमच्यावर उरणार नाही. मानव भौतिकतेच्या वर जाईल आणि उच्चतम मूल्ये ही मानवी जीवनाचे अविभाज्य अंग होतील, तरच चारित्र्य उजळून निघेल. रामचरित्राचे विस्मरण झाले की, अनैतिकता, भोगवासना शिगेला पोचते, तेव्हा राष्ट्राचे अधःपतन होतेच. इतिहासात याचे अगणित दाखले आहेत.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(‘मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२२ यामधून हा राष्ट्र-धर्मविषयक लेख घेतलेला असून आम्ही त्यांचे आभारी आहोत.)
प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचा लिखाणाविषयीचा तत्त्वनिष्ठ आणि निर्भीड दृष्टीकोन !प.पू. गुरुदेवांनी त्यांच्या काळातील सर्व संवेदनशील विषयांवर सर्वांगाने लेखन केले. मोठमोठे राजकारणी, समाजसुधारक, पत्रकार आणि लेखक ज्या विवादास्पद विषयांविषयी लिहायला मागे-पुढे पहातात, ते सर्व विषय प.पू. गुरुदेवांनी पूर्णतः हाताळले. जेव्हा अतिशय संवेदनशील विषयावर लिहायचे असते, तेव्हा लिहिणार्याच्या मनावर बर्याचदा दडपण असते; कारण तिथे ‘कुणाविषयी तरी राग, कुणाविषयी तरी लोभ, स्वतःचा स्वार्थ, आपल्याला कुणी नावे ठेवतील का ? अशी भीती’, असे सर्व एकत्र मिसळलेले असते; परंतु प.पू. गुरुदेवांसारखे साक्षात्कारी योगी केवळ करुणेपोटी या जगात स्वतःचे अस्तित्व ठेवून असतात. त्यांच्या ठिकाणी राग, लोभ, स्वार्थ यांसारखे विकार अस्तित्वातच नसतात. त्यांचे परमेश्वराच्या ठिकाणी सततचे अनुसंधान असल्यामुळे ते पूर्ण निर्भय असतात. जाणलेले सत्य लोकांना सांगण्यासाठी त्यांची लेखणी योग्य वेळी कार्यरत होतेच होते. एवढे असले, तरी कुणी अयोग्य कार्य केलेली व्यक्ती प.पू. गुरुदेवांच्या समोर आली, तर ते ‘त्या व्यक्तीचे कल्याण कशात आहे ?’, याचाच विचार करतील. वरील सर्व गोष्टींमुळे भारताची फाळणी, इंग्रजांची व्यापारी दृष्टी, हिंदूंचे धर्मांतर, स्वातंत्र्योत्तर काळातील लपवलेला इतिहास, वर्णाश्रम, धर्म आणि यांसारख्या इतर अनेक संवेदनशील गोष्टींवर प.पू. गुरुदेवांनी निर्भयपणे लिखाण केले आहे ! (साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२३) |