संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनांचे हृदय परिवर्तन करणे ब्रह्मदेवालाही शक्य नसणे !
पोतो दुस्तर- वारि- राशितरणे दीपोऽन्धकारागमे ।
निर्वाते व्यजनं मदान्ध- करिणां दर्पाेपशान्त्यै सृणिः ॥
इत्थं तद् भुवि नास्ति यस्य विधिना नोपाय- चिन्ता कृता मन्ये ।
दुर्जन- चित्त- वृत्ति- हरणे धातापि भग्नोद्यमः ॥
– हितोपतोदेश, मङ्गलाचरण, श्लोक १६५
अर्थ : दुस्तर सागराला तरून जाण्यासाठी नौका, अंधःकारातून जाण्यासाठी दिवा, वारा नसतांना पंखा, हत्तीचा मद शांत करण्यासाठी अंकुश इत्यादी उपाय ब्रह्मदेवाने निर्माण केले; पण दुर्जनाचे हृदय परिवर्तन करण्यासाठी त्या विधात्याने कोणत्याही उपायांचा विचार केला नाही. दुर्जनाच्या चित्तवृत्तीला परिवर्तन करण्याच्या कामी ब्रह्मदेवसुद्धा अयशस्वी झाला.
पांडवांचे राज्य पांडवांना देण्यास श्रीकृष्णसुद्धा अपयशी ठरला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, श्रीकृष्ण आणि विदुर अशा मोठ्या लोकांनी सांगितले; पण दुर्योधनाचे हृदय परिवर्तन कुणीही करू शकले नाही. प्रत्यक्ष ईश्वरी अवतार श्रीकृष्णसुद्धा जेथे अपयशी ठरला, तेथे इतरांचे काय ?
दुर्जन सज्जन होणे अशक्य !
क्वचित् सर्पाेऽपि मित्रत्वमियात् नैव खलः क्वचित् ।
न शोषशायिनोऽप्यस्य वशे दुर्याेधनो हरेः ॥
अर्थ : क्वचित् सर्पसुद्धा मित्र होईल; पण दुर्जन सज्जन होणार नाही. भगवंताचा शेष मित्र झाला; पण त्याला दुर्योधनाला वश करता आले नाही.
दुर्जन व्यक्ती मृत्यूसमयीही दुष्टपणानेच वागणे : दुष्ट माणूस मरतांनासुद्धा लोकांचे वाईट करून मरतो. एक अत्यंत दुष्ट माणूस होता. त्याने जन्मभर दुसर्यांना त्रास दिला. त्याचा मरणसमय जवळ आला. त्याने मुलांना जवळ बोलावले. मुलांना वाटले, ‘त्याला शेवटी काही पश्चात्ताप झाला असेल’; पण छे ! तो दुष्ट म्हणाला, ‘मी मेल्यावर माझ्या छातीत सुरा खुपसा आणि माझे प्रेत शेजार्याच्या अंगणात टाका, म्हणजे त्यांच्यावर खुनाचा आळ येईल अन् ते सारे फासावर जातील.’ आता या दुष्टपणाला काय म्हणावे ?