Hafiz Saeed : भारताने पाकिस्तानकडे आतंकवादी हाफिज सईद याला भारताकडे सोपवण्याची केली मागणी !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आतंकवादी हाफिज सईद याला भारताच्या कह्यात देण्याची मागणी भारताने केली आहे. या संदर्भात पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले आहे. भारताने याला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. भारताने पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे अधिकृतरित्या हाफिज सईद याला भारताकडे देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर पाककडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
हाफिज सईद याला पाकिस्तानने वर्ष २०१९ मध्ये अटक केली होती. त्याला न्यायालयाने आतंकवादाला अर्थपुरवठा केल्यावरून १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अन्य एका आरोपावरून त्याला ३१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हाफिज सईद याचा राजकीय पक्ष लढवत आहे निवडणूक !
हाफिज सईद सध्या पाकच्या कारागृहात असला, तरी त्याचा ‘पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग’ पक्ष पाकमध्ये संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका लढवत आहे. हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईद लहोर येथून निवडणूक लढवत आहे.