Kannada Shop Signboards : कन्नड भाषेत दुकानांचे नामफलक न लावण्यावरून बेंगळुरू येथे कर्नाटक रक्षण वेदिकेकडून तोडफोड !

कर्नाटक रक्षण वेदिके

बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकमधील दुकानांच्या नावांचे फलक कन्नड भाषेमध्ये  नसल्याने कर्नाटक रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २७ डिसेंबर या दिवशी बेंगळुरू शहरातील काही दुकाने आणि कार्यालये यांच्या फलकांची तोडफोड केली. या संघटनेने शहरातील अनेक भागांत फेर्‍याही काढल्या. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी व्यापारी संकुल, दुकाने, व्यावसायिक इमारती, बहुराष्ट्रीय आस्थापनांची कार्यालये आदींना लक्ष्य केले. पोलिसांनी संघटनेचे निमंत्रक टी.ए. नारायण गौडा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले.

कर्नाटकात व्यवसाय करायचा असल्यास आमच्या भाषेचा आदर करावाच लागेल ! –  कर्नाटक रक्षण वेदिके

नारायण गौडा म्हणाले की, बृहन् बेंगळुरू महापालिकेच्या नियमानुसार नामफलकांवरील ६० टक्के मजकूर कन्नड भाषेमध्ये असणे आवश्यक आहे. आमचा कुणाच्याही व्यवसायाला विरोध नाही; मात्र कर्नाटकात व्यवसाय, व्यापार करायचा असल्यास आमच्या भाषेचा आदर करावाच लागेल. कन्नड अक्षरे लहान आकारात लिहिल्यास आम्ही ती पालटण्यास भाग पाडू. कन्नड भाषेच्या आमच्या प्रेमाकडे दुर्लक्ष करणे लोकसभा निवडणुकीवेळी जड जाऊ शकते, अशी चेतावणी गौडा यांनी राज्य सरकारला दिली.

सरकार कन्नड भाषेच्या संदर्भात सर्व उपक्रमांना पाठिंबा देते ! – गृहमंत्री परमेश्‍वर

या आंदोलनाविषयी राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर म्हणाले की, कन्नड कार्यकर्ते अनेक दिवसांपासून नामफलक कन्नडमध्ये करण्यासाठी चेतावणी देत आहेत. कन्नड राज्याची अधिकृत भाषा असल्यामुळे सरकार त्याविषयीच्या सर्व उपक्रमांना पाठिंबाच देते. (जर सरकारचा असा पाठिंबा आहे, तर सरकार नामफलक कन्नड भाषेत लावण्यासाठी व्यापर्‍यांना बाध्य का करत नाही ? कि राजकारण करण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करते ! – संपादक)