Sand Mafia Goa : होड्यांवर कारवाई करण्याची अधिकार्यांची चेतावणी; पण प्रत्यक्षात अधिकारी फिरकलेच नाहीत !
अवैध रेती उपसा
म्हापसा, २७ डिसेंबर (वार्ता.) : पेडणे येथे अवैध रेती उपसाप्रकरणी कह्यात घेतलेल्या होड्यांवर २७ डिसेंबरला कारवाई करणार, अशी चेतावणी खाण आणि उद्योग खात्याच्या अधिकार्यांनी दिली होती; परंतु प्रत्यक्षात कोणताही अधिकारी तेथे फिरकला नाही. कह्यात घेतलेल्या होड्यांपैकी गजानन तेली यांच्या मालकीच्या होडीवर खाण आणि उद्योग खात्याच्या अधिकार्यांनी कारवाई करून २६ डिसेंबर या दिवशी सायंकाळी न्हयबाग येथे ती होडी तोडली. त्यानंतर २७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता ‘पोलीस संरक्षणात उर्वरित २५ होड्या तोडणार’, असे या खात्याच्या अधिकार्यांनी घोषित केले होते; परंतु प्रत्यक्षात कोणताही अधिकारी तिथे फिरकला नाही. त्यामुळे ‘एकाच होडीवर का कारवाई केली ?’, असा प्रश्न स्थानिक लोक विचारत आहेत. या अधिकार्यांनी आज कारवाई केली नसली, तरी ते कधीही येऊन कारवाई करतील. त्यामुळे कारवाईची टांगती तलवार आमच्या माथ्यावर आहे, असे मत येथील रेती व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.