Water Issue Goa : तिलारी धरणातून गोव्याच्या बाजूने पाणीपुरवठ्याला प्रारंभ
गिरी (म्हापसा) पंपिंग स्टेशनला पाणी २८ डिसेंबरला सायंकाळपर्यंत पोचणार
पणजी, २७ डिसेंबर (स.प.) : गेले काही दिवस तांत्रिक गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणातून पाणी सोडण्यास येणारी अडचण दूर होऊन आज, २७ डिसेंबरला पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी धरणातून गोव्याच्या बाजूने पाणीपुरवठ्यास प्रारंभ झाला, अशी माहिती जलस्रोत खात्याने २७ डिसेंबरला दिली. कालवे, धरणाचे दरवाजे यांच्या, तसेच धरणाच्या दुरुस्तीसाठी १३ नोव्हेंबर २०२३ पासून धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने गोवा सरकारला दिलेल्या आश्वासनानुसार तिलारी कालव्याचे काम २२ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले; परंतु तांत्रिक अडचणीमुळे पाणी सोडता आले नव्हते.
गोव्याच्या सीमेपासून आत डावीकडच्या ४.५ कि.मी. लांबीच्या अस्नोडा आणि पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांना पाणी पुरवणारा मुख्य कालवा अन् उजवीकडील ५ कि.मी. लांबीच्या चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवणारा कालवा यांच्या दुरुस्तीचे, तसेच इतर काम जलस्रोत खात्याने पूर्ण केले आहे. महाराष्ट्र सरकारनेही मणेरी गाव आणि परिसरातील कालव्यांच्या गंभीर भागांची आणि इतर लहान-मोठी दुरुस्ती केली आहे.
२७ डिसेंबरला सकाळी सोडलेले पाणी दुपारपर्यंत गोव्याच्या हद्दीत पोचले असून २८ डिसेंबरला सायंकाळपर्यंत गिरी (म्हापसा) पंपिंग स्टेशनला पोचेल, असा जलस्रोत खात्याचा अंदाज आहे. त्यानंतर तेथील पाण्याचा साठा करण्याच्या टाकीत ते सोडले जाईल.