अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्नरत ! – राजेश क्षीरसागर
कोल्हापूर – अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभु श्रीराम मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला श्रीराम मंदिराची माहिती होण्यासाठी एका पुस्तिकेची निर्मिती केली आहे. या पुस्तिकेतील काही पाने जोडल्यावर श्रीराम मंदिराची प्रतिकृती सिद्ध होते. याद्वारे अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली.
या प्रसंगी पुस्तिकेचे मुद्रण करणारे श्री. साईप्रसाद बेकनाळकर, शारदा बामणे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, सर्वश्री अवधूत भाट्ये, प्रवीण पवार, मधुकर मांडवकर आदी उपस्थित होते.
१. या पुस्तिकेमध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनवण्याचे ‘क्यूआर् कोड’द्वारे चित्रीकरण, तसेच तंत्र आणि साहित्य देण्यात आले आहे. या पुस्तिकेमध्ये अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा इतिहास, संपूर्ण रामायण चित्रमय रूपात, श्रीरामरक्षा, प्रभु श्रीरामांची १०८ नावे, तसेच लहान मुलांना रंगवण्यासाठी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमा देण्यात आल्या आहेत.
२. देशात अशी संकल्पना प्रथमच कोल्हापुरात राबवली जात असून ही पुस्तिका ५० सहस्र लोकांपर्यंत पोचवण्याचा मानस आहे. यासाठी नावनोंदणी करण्यात येत असून या मंदिरासमवेत कुटुंबियांनी एक छायाचित्र पाठवायचे आहे. यातून ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार असून त्यातील १० कुटुंबियांना अयोध्येला जाण्याची संधी मिळणार आहे.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १ जानेवारीपासून प्रत्येक श्रीराम मंदिरात श्रीरामाचा जप, तसेच ‘श्रीराम धून’ लावावी, असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.’’