चेन्नई (तमिळनाडू) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या हस्ते तमिळ भाषेतील ‘सनातन अँड्रॉईड पंचांग २०२४’चे लोकार्पण

तमिळ भाषेतील ‘सनातन पंचांग २०२४

चेन्नई – तमिळ भाषेतील ‘सनातन अँड्रॉईड पंचांग २०२४’चे लोकार्पण चेन्नईमधील ‘स्पेन्सर प्लाझा मॉल’चे संचालक श्री. एम्. बालसुब्रह्मण्यम यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. एम्. बालसुब्रह्मण्यम हे स्वामी भूमानंद यांचे शिष्य असून ते प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहेत. ‘अँड्रॉईड पंचांग’ लोकार्पण सोहळ्यात सनातन संस्थेचे श्री. बालाजी कोल्ला, श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार उपस्थित होत्या.

तमिळ भाषेतील ‘सनातन अँड्रॉईड पंचांग २०२४’चे लोकार्पण केल्यानंतर श्री. एम्. बालसुब्रह्मण्यम यांनी तमिळ पंचांगाची प्रशंसा करणारा त्यांचा एक व्हिडिओ उपस्थितांना दाखवला. या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते म्हणाले, ‘‘समाजात सनातन पंचांगाचा प्रचार करण्यासाठी इतर हिंदु संघटनांनीही सहभागी झाले पाहिजे. हिंदु संस्कृती आणि सनातन धर्म यांविषयी सर्वांना अभिमान वाटला पाहिजे.’’

श्री. एम्. बालसुब्रह्मण्यम यांचा परिचय

श्री. एम्. बालसुब्रह्मण्यम हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘तमिळ सनातन पंचांगा’ला  प्रायोजित करत आहेत. ‘सनातन ग्रंथ अभियाना’च्या वेळी त्यांनी तमिळ ग्रंथांचा एक संपूर्ण संच विकत घेतला होता आणि त्यांच्या मॉलमधील वाचनालयात ठेवला होता. ‘तमिळ सनातन पंचांग २०२४’ मध्ये त्यांनी ‘स्पेन्सर प्लाझा मॉल’चे विज्ञापन दिले आहे. याचसमवेत ‘तमिळ सनातन पंचांग २०२४’चे वितरण करण्याच्या दृष्टीने त्यांनी स्वतःहून त्यांच्या ओळखीच्या अनेक जणांचे संपर्क दिले आहेत.