हिंदुविरोधी कथानकांच्या खंडणासाठी हिंदु धर्माचा अभ्यास करणे आवश्यक ! – अनिरुद्ध देवचक्के, माजी संपादक, दैनिक ‘दिव्य मराठी’
नगर येथे एक दिवसाचे हिंदु राष्ट्र अधिवेशन
नगर – हिंदूंच्या विरोधात चुकीचे नॅरेटीव्ह (कथानके) सिद्ध केले जात आहे. अशा हिंदुविरोधी कथानकांच्या खंडणासाठी हिंदूंनी हिंदु धर्माचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन दैनिक ‘दिव्य मराठी’चे माजी संपादक श्री. अनिरुद्ध देवचक्के यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेमराज सारडा महाविद्यालयातील सभागृहात पार पडलेल्या एक दिवसाच्या जिल्हा हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते.
या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, मुंबई उच्च न्यायालयातील अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध संघटनाचे प्रतिनिधी, मंदिर विश्वस्त, अधिवक्ता, धर्मप्रेमी, गोरक्षक आणि कीर्तनकार उपस्थित होते. या अधिवेशनास विविध मान्यवरांनी संबोधित केले.
वक्फ बोर्डच्या विरोधात संवैधानिक लढा आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
गुहा येथील कानिफनाथ मंदिराने दिलेला वक्फ बोर्डाच्या विरोधातील लढा असो किंवा अहिल्यानगर शहरात विविध अतिक्रमणाच्या विरोधात झालेले यशस्वी कायदेशीर प्रयत्न असो, ही यशस्वी पद्धत सर्वत्र राबवली पाहिजे. या वेळी श्री. सुनील घनवट यांनी हलाल जिहाद, शहरी नक्षलवाद, ‘ब्रेकिंग इंडिया’ (भारताची फाळणी) या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘देवाचे सेवक’ या भावाने केलेली सेवा देवाच्या चरणी अर्पण होते ! – मिलिंद चवंडके, पत्रकार आणि नाथ संप्रदायाच्या ग्रंथांचे गाढे अभ्यासक
श्रद्धेने आणि भक्तीने ‘देवाचे एक सेवक’ या भावाने मंदिर विश्वस्त म्हणून सेवा केली, तर ती देवाच्या चरणी अर्पण होते. हे कार्य करतांना मंदिराच्या धनाचा उपयोग योग्य मार्गाने होतो आणि असे धार्मिक कार्य करत असतांना देवही आपल्याला साहाय्य करतो.
संतांनी केलेले मार्गदर्शन१. सद्गुरु नंदकुमार जाधव : हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी साधना करा. २. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी : मंदिरे ही भक्तांच्या कह्यात देण्यात यावीत, जेणेकरून मंदिरांचे पावित्र्य, सात्त्विकता आणि व्यवस्थापन हे संवर्धन होण्यास साहाय्य होईल. क्षणचित्रे १. या अधिवेशनामध्ये ‘श्री दिगंबर गेंट्याल शिवप्रहार संघटने’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सूरज आगे, श्री. कमलेश भंडारी, श्री. अभिमन्यू जाधव इत्यादींनी मार्गदर्शन केले. २. धर्मकार्यामध्ये विशेष कृती केल्याविषयी श्री. अमोल शिंदे, ‘कानिफनाथ देवस्थान गुहा’ यांचे प्रतिनिधी श्री. श्रीहरि आंबेकर आणि ब्राह्मणी येथून आलेले श्री. नवनाथ दंडवते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. |