अयोध्येतील श्रीराममंदिर असणार ‘स्वयंपूर्ण’ !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – प्रभु श्रीराम हा १०० कोटी हिंदूंचा म्हणजे या भारतभूमीचा आत्माच ! २२ जानेवारी म्हणजे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जसजसा जवळ येत आहे, तसतसा कोट्यवधी हिंदूंमधील उत्साह वृद्धींगत होत असल्याचे पहायला मिळत आहे. या उत्साहाला साजेसे असे राममंदिर उभारले जात आहे. भव्य श्रीराममंदिर एकूण ३९२ खांबांच्या आधारे उभे रहात आहे. त्याच्या संरक्षणासाठी १४ फूट रुंदीची आणि ७३२ मीटर व्याप्तीची भक्कम तटबंदीही उभारली जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग यांना मंदिरात सहज प्रवेश करता यावा, तसेच सहज हालचाल करता यावी, यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. श्रीराममंदिर विविध सोयीसुविधांनी सुसज्ज आणि स्वयंपूर्ण असणार आहे. श्रीरामजन्मभूमी मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी २६ डिसेंबर या दिवशी न्यासाच्या कार्यालयात या भव्य संकुलाच्या आराखड्याचे सादरीकरण केले.
ही आहेत या भव्य राममंदिर परिसराची काही वैशिष्ट्ये !
- ७० एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारले जात आहे श्रीराममंदिर संकुल !
- ७० एकर परिसरापैकी ७० टक्के परिसर असणार पूर्णपणे हरित !
- प्रतिदिनच्या वापरासाठी लागणारे पाणी, तसेच सांडपाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने एकूण तीन विशेष प्रकल्प संकुलाच्या परिसरातच उभारले जात आहेत.
- विशेष अग्नीशमन यंत्रणा उभारण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून भूमीखाली पाण्याचे मोठे साठे निर्माण करण्यात येत आहेत.