Fire Accident : मडगाव (गोवा) येथे कपड्याचे दुकान आगीत जळून खाक
मडगाव, २६ डिसेंबर (वार्ता.) : मडगाव येथे न्यू मार्केट परिसरात असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला आग लागून ते जळून खाक झाले. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार २६ डिसेंबरला सकाळी ११.३५ च्या सुमारास हा प्रकार घडला. ही आग इतरत्र पसरल्याने या दुकानाजवळच्या ४ दुकानांना त्याची झळ बसली. आग लागल्यानंतर तातडीने अग्नीशमन दलाला बोलावण्यात आले; परंतु अत्यंत अरूंद रस्ते आणि रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहने यांमुळे आग विझवणारे बंब घटनास्थळापर्यंत पोचण्यास विलंब झाला. आग लागण्याची घटना दुकानातील वातानुकूलिन यंत्रामुळे घडली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्नीशमन दलाच्या पथकाने व्यक्त केला आहे.
(सौजन्य : Gomantak Tv)
हे दुकान चाळवजा जागेत आहे. स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी या ठिकाणी पडताळणी केली आणि त्यानंतर नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, वाहतूक अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. या भागात अग्नीशमन यंत्रणा बसवण्याची आमची मागणी गेल्या ३५ वर्षांपासून आहे; परंतु त्याची अजूनपर्यंत पूर्तता झालेली नाही, असे न्यू मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी सांगितले. (मागणी करूनही ३५ वर्षे अग्नीशमन यंत्रणा न बसवणारी पालिका आणि इतर यंत्रणा येथील संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)