आध्यात्मिक पाथरवट बनूया

।। श्रीकृष्णाय नमः।।

पू. अनंत आठवले

पाथरवट पाषाणाची मूर्ती बनवतो. खरेतर तो मूर्ती बनवत नसतो. मूर्ती पाषाणात असतेच. पाथरवट छिन्नी, हातोडा इत्यादी साधन वापरून मूर्तीच्या आसपासचा पाषाणाचा भाग काढून टाकतो आणि मग उरते ती मूर्ती ! पाथरवट आधी दूरचे भाग काढून टाकतो, मग जवळचे भाग काढतो. त्यानंतर अगदी लागून असलेला भाग हळुवारपणे काळजीपूर्वक काढल्यावर मूर्ती स्पष्ट होते.

साधनेने ईश्वरप्राप्तीचेसुद्धा असेच असते. केवळ वेगळेपणा हा असतो की मूर्ती स्थूलातली असते आणि काढून टाकायचे भाग स्थूलच असतात, तर ईश्वर साक्षात् करण्याचे काम सूक्ष्मातील असते.

ईश्वराचा अंश असलेला आत्मा आपल्यात असतोच. कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी वेगवेगळ्या साधना, ह्या छिन्नी, हातोड्याचे काम करतात. त्या साधनांनी आपण आधी आत्म्याला मायेत गुंतवणार्‍या दूरच्या भागांना काढून टाकतो. ते भाग म्हणजे आपले गाव, संपर्कात येणारी माणसे, विविध कपडे, निसर्गसौंदर्य, करमणुकीची साधने, सुगंध, आकर्षक दृष्य, गोड गाणी, रुचकर खाद्य, सुखद स्पर्श इत्यादी अनेकानेक गोष्टींचे आकर्षण, त्यांच्यामध्ये वाटणारी गोडी. साधनेने आपण ह्यांच्यातील रुची घालवतो.

त्यानंतर अधिक जवळचा भाग काढायचा असतो. तो भाग आहे आपले धन, नातेवाईक, घरदार, गाडी, व्यवसाय इत्यादी. साधनेने ह्यांच्यातील ममत्व, आसक्ती घालवावी लागते.

शेवटी अगदी लागून असलेले भाग काळजीपूर्वक, सतर्कतेने काढावे लागतात. ते म्हणजे मन आणि बुद्धीमध्ये असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ममता आणि अहंकार. प्रशंसा, मान-सन्मानाची कामना; आपल्याशी वाईट वागणार्‍यांचा येणारा राग; अधिक धनप्राप्तीचा लोभ; व्यसनांचा मोह; आपल्या शक्तीचा, उच्च पदाचा, सौंदर्याचा, धनाचा, मद; दुसर्‍यांच्या उत्कर्षाने वाटणारा मत्सर; पती/ पत्नी, मुले, नातवंडे इत्यादींमधील ममता; आपल्या देहाविषयी आपला ‘मी’ पणा, ईश्वरापासून वेगळे असल्याचा भाव अशा अनेक रूपांनी हे अगदी लागून असलेले भाग व्यक्त होत असतात. ह्यांना ‘अगदी लागून असलेले’ अशासाठी म्हटले आहे की ते स्वभावगत असतात आणि त्यांचे संस्कार आधींच्या जन्मांतूनसुद्धा आलेले असतात. मन आणि बुद्धी काढून टाकायचे नसतात, काढून टाकता येतही नाहीत. मनातील विचार-संकल्प आणि बुद्धीच्या निर्णयांना योग्य वळण द्यायचे असते.

आपण ईश्वराला प्राप्त करत नसतोच. तो आपल्यातच असतो. आपण साधनारूपी करणांनी ईश्वर प्रत्यक्ष करण्यात असणार्‍या बाधा काढून टाकत असतो. तो वर सांगितलेला अगदी लागून असलेला भागसुद्धा काढून टाकला की शेवटी काय होईल ? केवळ शुद्ध आत्म्याचा म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार !

चला, चांगले आध्यात्मिक पाथरवट बनूया !

– अनंत आठवले

३.१२.२०२३

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजी !

लेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत.