सांध्यांची काळजी प्रारंभीपासूनच घ्या !
उतारवयात सांधे दुखणे चालू झाले की, ‘संधीवाताचा त्रास चालू झाला’, असे आपण म्हणतो. ‘संधीवात’ या नावावरून आपल्याला लक्षात येईल की, सांध्यांच्या ठिकाणी वात दोषामुळे होणारा बिघाड ! हा संधीवात शरिरातील कोणत्याही सांध्यांच्या आश्रयाने होऊ शकतो. संधीवाताचे स्वरूप जाणून घेण्यापूर्वी आपल्याला सांध्यांविषयी थोडेसे जाणून घेतले पाहिजे.
१. सांध्यांची रचना कशी असते ?
अ. आपल्या शरिरात मुख्यत्वे दोन प्रकारचे सांधे असतात. एक म्हणजे फारसे न हलणारे आणि त्या सांध्यांमध्ये फार पोकळी नसते. मणक्यांमध्ये आणि डोक्यात हे सांधे असतात. दुसरा प्रकार, म्हणजे ज्या सांध्यांची सहजगत्या हालचाल होते आणि त्यांच्यामध्ये थोडी पोकळी असते, उदा. खांदा, कोपर, मनगट, बोटे, कंबर, गुडघा, घोटा.
आ. सांध्यांमध्ये दोन हाडे एकत्र येतात तिथे घर्षण होऊ नये; म्हणून अतिशय गुळगुळीत आणि लवचिक चकती असते.
इ. सांधे एकमेकांना बांधून रहावेत; म्हणून त्यांच्या भोवती स्नायूबंधने असतात.
ई. सायकलचे चाक नीट फिरण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वंगण घालतो, तसेच सांध्यांची हालचाल सुरळीत होण्यासाठी हाडांच्या भोवती वंगण स्वरूप एक द्रवपदार्थ असतो. त्याला ‘सायनोवियल फ्लुईड’ म्हणतात.
उ. आयुर्वेदानुसार सांध्यांच्या ठिकाणी कफ दोष हा वंगणाचे कार्य करतो, तर वात दोष हा सांध्यांच्या हालचालींना उत्तरदायी असतो.
अशा सांध्यांची प्रारंभीपासूनच काळजी घेतली, तर म्हातारपणी सुद्धा शरिराचे सांधे निरोगी आणि कार्यक्षम राहू शकतात.
२. संधीवात होण्याची कारणे कोणती ?
अ. सतत गारठ्याच्या जागेत बसणे, सतत पाण्यात काम करावे लागणे, सतत वातानुकूलित जागेत बसणे.
आ. बैठे व्यवसाय किंवा अतीकष्टाची कामे सतत करणे.
इ. सांध्यांना मार लागणे अथवा दुखापत होणे.
ई. अतीलठ्ठपणा
उ. उतारवयात सांध्यांमधील वंगण न्यून होऊन हाडे झिजतात आणि सांधे दुखू लागतात.
ऊ. क्षयरोगासारखे रोग (टीबी), गुप्तरोग किंवा इतर प्रकारचा जंतुसंसर्ग, लहान वयात झालेला ‘रुमॅटिक फिव्हर’ (rheumatic fever – विशिष्ट प्रकारचा ताप) हे आजारही सांधेदुखीला कारणीभूत ठरतात.
सांध्यांमध्ये वेदना, सूज ही लक्षणे प्रारंभीला आढळतात. ही लक्षणे दुर्लक्षित झाल्यास कधी कधी सांध्यांमध्ये कायम स्वरूपाच्या विकृतीही निर्माण होऊ शकतात.
३. संधीवात होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ?
अ. सतत एका जागी बसणे आणि वातानुकूलित वातावरणात दीर्घकाळ बसणे टाळावे.
आ. थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे.
इ. अतीशारीरिक दगदग, अतीव्यायाम (जिममध्ये घंटोन्घंटे व्यायाम करणारे या प्रकारात मोडतात) करणे टाळावे.
ई. एका जागी सलग २ ते ३ घंटे बसणे किंवा ५ ते ६ घंटे सलग उभे राहून काम करणे टाळावे.
उ. झोपतांना मऊ फोमच्या गाद्या वापरू नयेत. शक्यतोवर लाकडी पृष्ठभागावर कापसाची गादी घालून त्यावर झोपावे.
ऊ. वयोमानानुसार शारीरिक झीज जरी कारणीभूत असली, तरी शरिराच्या चुकीच्या हालचाली (वेडेवाकडे बसणे, उठणे, चालणे किंवा चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे इत्यादी) हेही सांधेदुखीचे महत्त्वाचे कारणीभूत घटक आहेत. ते टाळले पाहिजेत.
ए. आयुर्वेदाने दिनचर्येमध्येच अभ्यंग सांगितले आहे, म्हणजे प्रतिदिन शरिराला तेल लावणे. त्यामागे किती दूरदर्शीपणा आहे, हे यावरून आपल्याला लक्षात येईल. शक्य झाले, तर प्रतिदिन किंवा आठवड्यातून २ ते ३ वेळा तरी संपूर्ण शरिराला तेल लावावे.
ऐ. तरुण आणि मध्यम वयस्क व्यक्तींनी नियमित व्यायाम अन् वृद्धांनी योगासने नियमित करावीत. सांध्यांच्या नियंत्रित हालचाली या व्यायाम आणि योगासने यांनी साध्य होतात.
ओ. आहारात दूध, नाचणी, कढीपत्ता, शेवगा असे पदार्थ असावेत.
४. संधीवातासाठी उपचार
थोडक्यात म्हणजे एखादे यंत्र जसे दीर्घकाळ चांगले रहावे; म्हणून आपण त्याला प्रतिदिन चालवतो, आवश्यक तसे वंगण देतो, स्वच्छता करतो तसेच आपल्या शरिराचे आहे. शरिराला कार्यक्षम ठेवणे, अभ्यंग करणे आणि शरीर शुद्धीसाठी पंचकर्म करणे, हे उपक्रम नियमित करावेत.
आयुर्वेदामध्ये स्नेहन (विशिष्ट तेलाने मालिश करणे), स्वेदन (वाफ घेणे, शेकणे), बस्ती, सांध्यांना लेप लावणे, पचनशक्ती सुधारण्यासाठी पोटातून औषध घेणे, विशिष्ट व्यायाम करणे, असे उपचार करता येतात आणि त्याचा चांगला लाभ होतांना दिसून येतो. कोणत्या रुग्णाने कोणत्या तेलाने मालिश करावी ? शेक कोणत्या पद्धतीचा घ्यावा ? हे आणि संधीवात विकाराच्या औषधोपचाराविषयी मात्र वैद्यांकडून जाणून घ्यावे.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (२४.१२.२०२३)