‘युसुफ्रुकट’ हा शब्द ‘बक्षीसपत्रा’मध्ये अनिवार्य करा !

(‘युसुफ्रुकट’, म्हणजे हयात असेपर्यंत भूमी, घर यांचा उपभोग घेणे आणि संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर जरी ‘सशर्त बक्षीसपत्र’ झाले असले, तरी रहाता येणे !)

१. मालमत्तेमुळे घरात वाद निर्माण होणे

‘एकदा एक गृहस्थ माझ्या कार्यालयामध्ये अत्यंत लगबगीने घाम टिपता टिपता आत आले. त्यांना बहुधा धाप लागलेली होती. मी त्यांना जरा शांत केले आणि पाणी प्यायला दिले. वय साधारणपणे ६५ वर्षांकडे झुकलेले असावे. त्यांनी पहाटे पहाटेच मला भ्रमणभाष करून वेळ घेऊन ते सकाळची बस पकडून वाळपईहून फोंड्याला ठरलेल्या वेळेत आले. त्यांच्या हातात एक जुनी धारिका होती. शांत झाल्यावर त्यांनी बोलायला प्रारंभ केला. त्यांना ३ मुले होती. तिघेही व्यवस्थित स्थिर स्थावर झालेले होते. हे गृहस्थ आपल्या स्वकमाईतून बांधलेल्या स्वतःच्या घरात स्वाभिमानाने रहात होते. नवरा आणि बायको दोघे थोड्या फार शेतभूमीची मशागत करून व्यवस्थितपणे गुजराण करत होते. त्यांचा चरितार्थ ठीक चालला होता. मध्यंतरीच्या काळात तीनही मुलांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांची मानसिक आणि भावनिक कोंडी होत होती. एकाची बाजू घेतली, तर दुसरा अप्रसन्न व्हायचा, ही भीती त्यांना असायची. त्यामुळे हे जोडपे त्यांच्या त्रासामुळे त्रस्त झाले होते. छोट्या-मोठ्या कुरबुरीमुळे वाद एकदम टोकाला पोचला होता. आई एका मुलाच्या बाजूने बोलत होती, तर वडील दुसर्‍या मुलाच्या बाजूने भाग घेत असत. मुलांच्या या ताणतणावामुळे या वृद्ध दांपत्यामध्येही वादाची ठिणगी पडू लागली होती. मालमत्तेच्या वादामुळे तीनही मुले एकमेकांशी भांडत होती. आई-वडिलांना तर भीती होती की, आता जिवंत असतांना त्यांचे रहाते घर आणि भूमी यांच्याविषयीचा वाद चाललेला आहे, तर त्यांच्या मृत्यूनंतर ही मुले एकमेकांचा जीव घेतील. ही अनाठायी भीती त्यांना आतून पोखरत होती.

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी

२. समाजातील लोकांनी दिलेले अनाहूत सल्ले आणि त्यावर काढलेला उपाय

अशा वेळी समाजातील विघ्नसंतोषी व्यक्ती नेमका चुकीचाच सल्ला देतात. तसाच प्रकार येथेही घडला होता. ते वृद्ध दांपत्य येईल-जाईल त्याला सहानुभूतीने सल्ला विचारायचे. कुणी सांगायचे, ‘एकदाचे सर्व विका आणि मुलांना पैसे वाटून द्या. मेल्यावर ही संपत्ती घेऊन जाणार आहात का ?’ एकाने सल्ला दिला, ‘मृत्यूपत्र करा आणि सर्व मुलांना तसे सांगा.’ एकाने सल्ला दिला, ‘जर आताच यांना मालमत्ता मालकीने मिळाली, तर सर्वजण शांत होतील. त्यासाठी ‘बक्षीसपत्र (गिफ्ट डीड)’ करून त्यांना शांत करा.’ एकाने सल्ला दिला, ‘सशर्त बक्षीसपत्र (कंडीशनल गिफ्ट डीड)’ करा’. एकाने सल्ला दिला, ‘पोलिसांकडे तक्रार करा आणि मुलांवर न्यायालयात दावा प्रविष्ट करा.’ असे अनेक महाभागांनी नानाविध सल्ले त्यांना दिले. त्यामुळे त्यांचा गोंधळ अधिकच वाढला. निर्णय घेऊ कि नको ? अथवा कोणता निर्णय घेऊ ? मग त्यांनी सर्वतोपरी असे ठरवले की, जो मुलगा त्यातल्या त्यात बरा आहे, शांत आहे आणि ज्याला अधिक आवश्यकता आहे, त्यालाच बक्षीसपत्र करून मालमत्ता देऊया. त्यांनी कोणत्या तरी अधिवक्त्यांना गाठले आणि बक्षीसपत्र करून स्वतःच्या रहात्या घरासह सर्व मालमत्ता धाकट्या मुलाला दिली.

३. बक्षीसपत्रात ‘युसुफ्रुकट’ शब्द न लिहिल्याने उद्भवलेली समस्या !

तेव्हा धाकट्याचे लग्न झालेले नव्हते. त्यामुळे तोही श्रावणबाळाच्याच भूमिकेत होता. त्यामुळे त्यानेही याला सहमती दर्शवली. जसे प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती त्याच्या इतरांशी असलेल्या नातेसंबंधांचा पुष्कळ पूर्वीपासून आढावा घेत असते, तसेच कोणकोणत्या वेळेस त्यांच्याशी कसे वागले, मग ते कसे सुधारले आणि आता कसे वागत आहेत, अशा आठवणींचा लेखाजोखा असतो. त्यावर ते ‘हा माझा खरा’ आणि ‘हा खोटा’ असे ठरवत असतात. त्या निकषानुसार या वृद्धांनी ‘लहान मुलगाच माझा खरा’, असे शिक्कामोर्तब केले होते. काही दिवसांनी त्याचे लग्न झाले आणि तो संसारात रमला. अनेक वर्षे निघून गेली. त्यानंतर त्या मुलाने आणि सुनेने स्वतःचे रंग दाखवायला प्रारंभ केला. त्या मुलाने बक्षीसपत्राच्या मालकी हक्कानुसार आई-वडिलांचे रहाते घर आणि भूमी विकायला काढली. या व्यवहारात ‘त्यांनी आगाऊ रक्कमसुद्धा घेतली आणि आता ‘विक्री करार (सेल डीड)’  शेवटच्या टप्प्यात येऊन पोचला’, हे समजल्यावर त्या वृद्ध दांपत्याच्या पायाखालची भूमीच सरकली; कारण मुलगा हा कायद्याने मालक होता आणि ती मालमत्ता तो विकू शकत होता. ‘आता काही करता येईल का ? आम्ही बेघर होऊन रस्त्यावर येऊ का ?’, अशी भीती त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. त्यांची स्पष्टपणे फसवणूक झालेली होती.

‘बक्षीसपत्र’ करतांना मुलाचे आणि आई-वडिलांचे तोंडी संभाषण वारंवार व्हायचे, ‘मी तुला हे सर्व आताच देत आहे; परंतु तू आम्हाला घरातून बाहेर काढू नको आणि शेवटपर्यंत आमचे संगोपन कर.’ यावर तो मुलगा नेहमी आश्वासक उत्तरे द्यायचा; पण गंमत म्हणजे ही गोष्ट अथवा अट त्याने ‘बक्षीसपत्रा’च्या मसुद्यामध्ये नमूदच केलेली नव्हती आणि त्यामुळे कायदेशीर ‘अडचण’ निर्माण झालेली होती. तोंडी बोलणे, वदवून घेणे आणि मसुदा अथवा बक्षीसपत्रामध्ये याचा लेखी स्पष्ट उल्लेख असणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कायदा ‘लेखी, साक्षी-पुराव्यावर चालतो.’ त्यामुळे येथे लेखी काही नसल्यामुळे प्रकरण गंभीर बनलेले होते. याविषयीचा दावा दिवाणी न्यायालयात गेलेला आहे. जे काही होईल ते तिथे होईलच; परंतु सर्व वाचकांना हे आवर्जून सांगावेसे वाटते की, स्वतःचे रहाते घर जर मुलाबाळांना ‘बक्षीसपत्रा’द्वारे देणार असाल, तर तुमच्या अधिवक्त्याने त्याच्या मसुद्यामध्ये ‘युसुफ्रुकट’ हा शब्द घातला आहे का ? ते बघा.

४. बक्षीसपत्र किंवा सशर्त बक्षीसपत्रात ‘युसुफ्रुकट’ शब्द का हवा ?

‘युसुफ्रुकट’ याचा अर्थ असा आहे की, हयात असेपर्यंत भूमी, घर यांचा उपभोग घेणे आणि त्यांच्या निधनानंतर जरी ‘सशर्त बक्षीसपत्र’ झाले असले, तरी रहाता येईल. थोडक्यात बक्षीसपत्र केलेली व्यक्ती ते झाल्यानंतर सुद्धा त्या घरात शेवटच्या श्वासापर्यंत राहू शकते. त्यांना कुणीही घराबाहेर काढू शकत नाही; परंतु दुर्दैवाने ‘युसुफ्रुकट’ हा शब्द पुष्कळ वेळा बक्षीसपत्राच्या मसुद्यात नसतो. बक्षीसपत्र हे आजकालच्या काळात ‘सशर्त’ असावे आणि त्यात ‘युसुफ्रुकट’ हा शब्दप्रयोग मसुद्यामध्ये असावयास हवा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोण, कधी भविष्यात कसे वागेल, हे सांगता येत नाही. पर्याय म्हणून मृत्यूपत्र नोंदणीकृत करावे. नाहीच जमल्यास ‘सशर्त बक्षीसपत्र’ करावे. ‘ताट द्यावे; पण पाट देऊ नये’, असे म्हणतात, ते खरेच आहे. ‘युसुफ्रुकट’ या शब्दाचा आग्रह अशिलाने त्यांच्या अधिवक्त्यांना अवश्य करावा.’

– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.