देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तपालखीचे आगमन !
पनवेल – श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ६.४० वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले ! अब्दागीर आणि भगवे ध्वज नाचवत भक्त पालखीत सहभागी झाले होते. ढोलकी आणि झांजा यांची नादधून आणि श्री दत्तात्रेयांच्या नामाचा गजर यामुळे वातावरण प्रफुल्लित झाले.
फुलांच्या माळांनी सजवलेल्या पालखीत श्री दत्तात्रेयांची प्रतिमा, त्यांची मूर्ती आणि प.पू. शिवगिरी महाराजांच्या पादुका आसनस्थ होत्या. धर्मध्वज घेतलेल्या भक्तांच्या पायावर जल अर्पण करून आणि धर्मध्वजाला कुंकू लावून ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी त्याचे पूजन केले. कलश घेतलेल्या सुवासिनींना हळद-कुंकू लावण्यात आले.
सनातनचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. अविनाश गिरकर यांनी पालखीतील श्री दत्तात्रेयांच्या प्रतिमेचे औक्षण करून पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण केले. त्यानंतर ‘अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त’ या जयघोषात आणि शंखध्वनी होऊन पालखीचे प्रस्थान झाले.