जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ६ सहस्र ५०० धर्मप्रेमींची उपस्थिती !
जळगाव – येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता शिवतीर्थ मैदानावर आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ६ सहस्र ५०० धर्मप्रेमींची उपस्थिती लाभली. या सभेला तरुणांची गर्दी लक्षणीय होती.
उपस्थित संत
फैजपूरचे महंत पवन दासजी महाराज, जळगावच्या भवानी माता मंदिराचे नंदकुमार त्रिपाठी महाराज, अखिल भारतीय संत पुजारी समितीचे विभागीय अध्यक्ष श्री बाल्या महाराज (ब्रह्मपूर), आडगाव (यावल) येथील ह.भ.प. देवगोपाल शास्त्री, जळगावच्या गायत्री मंदिराचे विश्वस्त श्री. धनंजयजी तिवारी, ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, धुळे येथील ह.भ.प. वासुदेव महाराज आर्विकर, भागवतकार मोरदे महाराज, प्रदीपजी महाराज, नाना गोपाल दासजी महाराज, नंदगावचे आचार्य शुक्लाजी महाराज, श्री १००८ महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती
उपस्थित मान्यवर
सभेला पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील, भाजपचे आमदार श्री. सुरेश भोळे, खासदार श्री. उन्मेश पाटील, उद्योगपती श्री. स्वरूप लुंकड, श्री. सपन झुनझुनवाला, अधिवक्ता प्रवीण जंगले, भाजपचे नगरसेवक श्री. राजूभाऊ मराठे, करंज येथील सरपंच श्री. समाधान सपकाळे, श्री नंदकुमार त्रिपाठी महाराज, डॉ. महेंद्र काबरा, डॉ. कमलाकर पाटील, शिवसेनेचे नगरसेवक श्री. मनोज चौधरी, अधिवक्ता भरत देशमुख (जळगाव), गुजरात समाजाच्या आध्यात्मिक मंचचे अध्यक्ष आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. राज पटेल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. नीलेश पाटील, ‘महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल’चे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख, पाचोरा भडगाव भाजपचे तालुका प्रमुख श्री. अमोल शिंदे, पाचोरा येथील वृंदावन रुग्णालयाचे संचालक श्री. नीळकंठ पाटील, शिवसेनेच्या जिल्हासंपर्क प्रमुख सौ. सरिता कोल्हे, डॉ. अश्विन सोनवणे, श्री. अमित भाटिया
वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे…
१. सभास्थळी पोलिसांनी ‘मेटल डिटेक्टर’ लावले होते. त्याद्वारे पडताळणी करूनच सर्वांना आत प्रवेश दिला गेला.
२. सभेत प्रवेश करतांना सर्वांचे टिळा लावून स्वागत करण्यात आले.
३. पारोळा (जिल्हा जळगाव) येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या प्रतिमा, तसेच हनुमानाची गदा, हिंदु राष्ट्राचे भगवे ध्वज घेऊन सभेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
४. पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील, भाजपचे जळगावचे खासदार श्री. उन्मेश पाटील, भाजपचे आमदार श्री. सुरेश भोळे आणि कार्यकर्ते यांनी भूमीवर बसून सभा ऐकली.
देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे ! – अविनाश धर्माधिकारी, संस्थापक-संचालक, चाणक्य मंडल परिवार
सर्वांमध्ये एकच ईश्वर भरलेला आहे. आपण त्याचेच अंश आहोत. ‘नमस्कार’ म्हणजे ‘माझ्यातील ईश्वरत्वाचा तुमच्यातील ईश्वराला प्रणाम !’ असा त्याचा अर्थ आहे. भारताचा अध्यात्म विचार विज्ञाननिष्ठ आहे. ‘संपूर्ण विश्वाचे कल्याण होवो’, हीच खरी हिंदु संस्कृती आहे. ‘ख्रिस्ती आणि मुसलमान आक्रमकांनी देश समृद्ध केला’, असा चुकीचा इतिहास आजच्या शिक्षणपद्धतीत शिकवला जात आहे. त्यांनी जगाची संस्कृती, हिंदु धर्म, भाषा यांविषयी विकृत अर्थाचा प्रसार करून हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बौद्ध, शीख आणि जैन हे पंथही हिंदु धर्माशी संलग्नित असून राज्यघटनेमध्ये या धर्मांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर आता अनेकजण वेगवेगळ्या संप्रदायांची मागणी करून अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून हिंदु धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून या प्रयत्नांना रोखण्यासाठी देशात समान नागरी कायदा तात्काळ लागू करावा.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त !
सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. यात साध्या वेशातील पोलीसही होते. सभेच्या आदल्या दिवशी सभास्थळी येऊन पोलिसांनी पहाणी करून समितीच्या कार्यकर्त्यांना काही सूचनाही केल्या होत्या. |