धर्माभिमानाचा अभाव दूर करून धर्माचरणी होणे, हीच काळाची आवश्यकता !  – पू. अमृतानंद महाराज

कोल्हापूर येथे प्रांतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन !

कोल्हापूर – धर्माभिमानाच्या अभावामुळे बहुसंख्य हिंदू केवळ मौजमजा करणे आणि दैनंदिन जीवन व्यतीत करणे यांतच व्यस्त आहेत. आज हिंदु धर्माची शिकवण ही अनेक दर्शन ग्रंथ, पौराणिक संदर्भ, आध्यात्मिक ग्रंथसंपदा यांद्वारे उपलब्ध आहे. विपुलता हेच आपल्या सनातन धर्मग्रंथांचे सामर्थ्य आहे. तरी या यापुढील काळात धर्माभिमानाचा अभाव दूर करून धर्माचरणी होणे, हीच काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गोरंबे येथील जंगली महाराज आश्रमाचे गुरुवर्य संत पू. अमृतानंद महाराज यांनी केले. ते कोल्हापूर येथील ‘कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघ कोल्हापूर’, येथे २४ डिसेंबर या दिवशी आयोजित प्रांतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन बोलत होते.

या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते. या अधिवेशनासाठी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील ७५ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

कथानकांचे कपोलकल्पित सनातन धर्मद्वेषी युद्ध जिंकण्यासाठी शत्रूबोध आणि युद्धनीती आवश्यक आहे ! – अभय वर्तक, सनातन संस्था

भारत आणि सनातन हिंदुद्वेषी ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) सिद्ध करून संपूर्ण समाजाला धर्मविरोधी बनवण्याचे ‘फोर्थ जनरेशन वॉर’ अर्थात् कपोलकल्पित कथानकांचे युद्ध जिंकण्यासाठी शत्रूबोध आणि युद्धनीती यांची आवश्यकता आहे. शत्रूबोध म्हणजे नक्की शत्रू कोण ? आणि शत्रुत्वाचे खरे स्वरूप ओळखून त्यानुसार युद्धनीती आखून आपल्याला हे युद्ध जिंकावे लागेल.

या प्रसंगी विविध विषयांवर मार्गदर्शन, गटचर्चा घेण्यात आली. अधिवेशनात हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, उद्धव ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव आणि श्री. आदित्य कराडे, जैन पदवीधर संघटनेच्या सौ. सुप्रिया पाटील, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे श्री. शरद माळी, संकेश्वर येथील श्री. जयप्रकाश सावंत, कागल येथील श्री. शिवगोंडा पाटील, वाठार येथील श्री. दिलीप भाटे यांनी धर्मकार्यात त्यांना आलेले अनुभवकथन केले.

क्षणचित्रे 

१. या अधिवेशनासाठी काही काळ पू. स्वामी आनंद काडसिद्धेश्वर महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती.

२. अधिवेशनात सर्वच हिंदुत्वनिष्ठांनी अभ्यासपूर्ण आणि कृतीच्या स्तरावरील विषय मांडले.

अधिवेशनासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ