सांगली येथील साधिका सौ. गीतांजली निटवे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

१. व्रते, विशेष सण आणि उत्सव असलेल्या दिवशी वातावरणात विशेष उत्साह अन् चैतन्य जाणवणे

सौ. गीतांजली निटवे

‘मी वर्ष २००२ मध्ये साधनेत आल्यापासून मला व्रते, विशेष सण आणि उत्सव असलेल्या दिवशी वातावरणात विशेष उत्साह अन् चैतन्य जाणवते. संकष्टी चतुर्थी असेल, तर एक दिवस आधी किंवा त्या दिवशी आपोआप माझ्या डोळ्यांसमोर श्री गणेश येऊ लागतो.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ नामजप केल्यावर त्रास न्यून होणे

वर्ष २०२१ मध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मला  होणार्‍या त्रासांवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सांगितला होता. हा नामजप केल्यावर काही दिवसांतच माझे निराशेचे आणि नकारात्मक विचार अन् दुःखी मनस्थिती न्यून झाली. पूर्वी ते सर्व नकारात्मक विचार मला माझेच वाटायचे. ‘पूर्वजांच्या त्रासामुळे असे विचार येतात’, हे कळले. त्यानंतर माझी साधना, नामजप आणि गुरूंवरील श्रद्धा वाढली.

३. सत्संगातील नामजप ऐकल्यावर त्रास उणावणे आणि एका संतांना ऑनलाईन सत्संगात पाहिल्यावर भावजागृती होणे

वर्ष २०२१ मध्ये एकदा माझे डोळे पुष्कळ दुखत होते. त्याच दिवशी एका ‘ऑनलाईन’ नामजप सत्संग चालू होता. सत्संगात ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप चालू होताच मला होणारा त्रास पूर्णपणे बंद झाला. त्या सत्संगात संतांना पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले. अनेक वेळा त्यांच्या स्मरणानेही माझ्या डोळ्यांत भावाश्रू येऊ लागतात.

४. घरी अग्निहोत्र केल्यामुळे चैतन्य अन् शांतता जाणवणे

वर्ष २०१४ मध्ये मी घरी अग्निहोत्र करत होते. मला अग्निदेवतेचे अस्तित्व जाणवायचे. तसेच अग्निहोत्र केल्यामुळे पुष्कळ चैतन्य जाणवायचे. ‘अग्निहोत्रातील सामुग्री अग्निदेवता ग्रहण करत आहे’, असे मला वाटायचे.

५. घराची स्वच्छता केल्यावर सात्त्विकतेमुळे शांतता जाणवणे

घर स्वच्छ केल्यावर, विशेषतः दिवाळीनिमित्त घराची पूर्णपणे स्वच्छता करून त्यानंतर वास्तूची शुद्धी केल्यावर मला पुष्कळ शांतता जाणवते. त्यानंतर माझी चिडचिड न्यून होते. ‘हा सात्त्विकतेचा परिणाम आहे’, असे मला वाटते. काही वेळा ‘आसपासची सृष्टी आणि मी एकच आहे’, असेही मला जाणवते.

६. संतांनी ‘अनुभूतीपेक्षा अंतरीचा आनंद श्रेष्ठ’, असे सांगितल्यावर आनंद मिळवण्याचे ध्येय घेणे

वर्ष २०१८ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी मला संतांचा सत्संग लाभला. तेव्हा संत म्हणाले, ‘‘अनुभूतीपेक्षा अंतरीचा आनंद श्रेष्ठ.’’ तेव्हापासून अंतरीचा आनंद हे माझे ध्येय झाले. ‘गुरूंनी माझी अंतरीची निराशा आणि नकारात्मकता ओळखली’, असे मला वाटले.

७.साधिकेच्या डोक्यावर सूक्ष्मातून मोरपीस दिसणे आणि या अनुभूतीच्या आठवणीने भावजागृती होणे

एकदा सत्संगात एका साधिकेला समोर बोलावले. ‘तिच्याकडे बघून काय जाणवते ?’ याविषयी प्रयोग करून घेतला. साधिका व्यासपिठावरून खाली उतरत असतांना मला तिच्या डोक्यावर मोरपीस दिसले. मला वाटले की, तिला श्रीकृष्ण आवडतो; म्हणून घातले असेल. ती माझ्या मागे येऊन बसल्यानंतर मी तिला ते मोरपीस दाखवायला सांगितले. ते तिथे नव्हते. ते मोरपीस सूक्ष्मातील होते; पण मला अगदी स्थुलातील वाटले होते. प.पू. गुरुदेवांनी मला माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी अनुभूती दिली. या अनुभूतीची मला जेव्हा आठवण होते, तेव्हा माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात. मी कधी निराश होते, तेव्हा मी या अनुभूतीची आठवण काढते. मी माझ्या वहीत आणि पर्समध्ये मोरपीस ठेवले आहे. जेणेकरून मला ही अनुभूती सदैव स्मरणात राहील. या अनुभूतीने माझ्या अंगावर रोमांच उभे रहातात.

धन्यवाद गुरुमाऊली ! तुमची कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. अशा थोर गुरुमाऊलींना कोटीशः प्रणाम !’

– सौ. गीतांजली वर्धमान निटवे, गावभाग, सांगली (२३.८.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक