Shriram Mandir : तुमच्या छातीवर बसून श्रीराममंदिर उभारले, हिंमत असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत या !

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधकांची कानउघाडणी

  • पुण्यात ‘अटल संस्कृती गौरव’ पुस्कार वितरण सोहळा !

‘अटल संस्कृती गौरव’ पुस्कार वितरण सोहळा

पुणे : काही जण आम्हाला ‘अयोध्येतील श्रीराममंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का ?’ असे विचारत आहेत. हे तेच लोक आहेत, जे आम्हाला ‘मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही बताएंगे’,  असे म्हणत खिजवत होते. त्यांना मला सांगायचे आहे की, तुमच्या छाताडावर बसून आम्ही श्रीराममंदिर उभारले आणि तारीखही सांगितली. धाडस असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत या, श्रीराममंदिर काय आहे ? ते तुम्हाला दाखवू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची कानउघाडणी केली. फडणवीस यांच्या हस्ते २५ डिसेंबर या दिवशी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे आणि उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने देण्यात येणार्‍या ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा तुमच्या किमान समान कार्यक्रमात श्रीराममंदिर आणि ‘कलम ३७०’ यांचा समावेश का नाही ?’ असे विरोधक डिवचण्याच्या हेतूने विचारत होते; परंतु ‘हा २२ पक्षांच्या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे.

माझ्या पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, तेव्हा श्रीराममंदिरही बनेल आणि कलम ३७० ही रहित होईल’, असे अटलजी सांगत. द्रष्ट्या अटलजींची ही स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारली आहेत.